Headlines

कौंडण्यपूर सज्ज, 17 जुलैला भगवान जगन्नाथांची रथयात्रा:सकाळी 9.30 वाजता रथयात्रेला प्रारंभ; छप्पन भोग, महाआरती‎




तालुक्यातील श्री रुक्मिणी द्वारकानाथ मंदिर (इस्कॉन श्रीधाम कौंडण्यपूर) तर्फे शुक्रवारी १७ रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथ पुरी येथे १६ जुलै ते २४ जुलै या कालावधीत रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इस्कॉनच्या अमरावती मंदिरात तसेच अंबागेटच्या आतील मंदिरातही या सोहळ्यास तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून महाराष्ट्रातील विविध भागांतील भक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रथयात्रेच्या प्रमुख यजमान म्हणून नागपूर येथील कांचन ठवकर यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ८.३० वाजता पहनडी विजय सोहळ्याने कार्यक्रमास प्रारंभ होईल. त्यानंतर भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी यांना रथावर विराजमान करण्यात येईल. ५६ भोग अर्पण केल्यानंतर महाआरती होईल. तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. सकाळी ९.३० वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारी ही रथयात्रा संपूर्ण श्रीधाम कौंडण्यपूर परिसराची परिक्रमा करून दुपारी २ वाजता इस्कॉन मंदिर परिसरात तिचा समारोप होईल. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार. महाप्रसादाचे प्रमुख यजमान म्हणून नागपूर येथील कमलेश ठवकर कार्यभार सांभाळणार आहेत. या धार्मिक सोहळ्यास अमरावती जिल्ह्यासह परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा महाराणींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन इस्कॉन कौंडण्यपूरचे अध्यक्ष अक्रूर प्रभू यांनी केले आहे. जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व जगन्नाथ रथयात्रा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक उत्सव मानला जातो. पूर्वी ही यात्रा ओडिशातील पुरी पर्यंतच मर्यादित होती. मात्र, इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या प्रयत्नांमुळे आज जगभरातील ७०० हून अधिक शहरांमध्ये जगन्नाथ रथयात्रा उत्साहात साजरी केली जाते. ब्रह्मांड पुराणात नमूद केल्याप्रमाणे, भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचे दर्शन घेणारा, रथाची दोरी ओढणारा किंवा रथासोबत भक्तिभावाने चालणाऱ्या भक्ताला विशेष पुण्याचा लाभ होतो, अशी धारणा आहे. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी रथावर आरुढ होऊन भक्तांना दर्शन देतात, हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कौंडण्यपूर येथील रथयात्रेतही भाविकांना या दिव्य सोहळ्याचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *