![]()
जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आठ संशयितांशी पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि राजस्थानचा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून फोनद्वारे संपर्क झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता या गँगकडून संशयितांच्या बँक खात्यात पैसा आला आहे का?
.
यात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व भुसावळ या तालुक्यातील संशयित आहेत. नाशिक व जळगाव येथील पथकासह व जिल्हा पातळीवरील अँटी टेररिस्ट ब्रँच (एटीबी) यांनी संयुक्त कारवाई करत भुसावळ येथेदोन दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले आठपैकी सात जण हे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याचे तर एक जण राजस्थानचा आंतरराष्ट्रीय गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगचा फॉलोअर असल्याचे समोर आले आहे.
मराठवाड्यातील १५ जणांची चौकशी; नाशिक, पुण्यात छापे
एटीएसने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १० संशयितांची (वैजापूर २, मिसारवाडी ३, हर्सूल १, आरिफ कॉलनी १, बायजीपुरा १ व गंगापूर येथील १ परप्रांतीय मजूर व अन्य भागातील १ जण) चौकशी केली, तर जालन्यातील २, धाराशिवमधील २, बीडमधील एकाला काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
तीन एजन्सीजची होती ३ महिन्यांपासून नजर…
राज्यात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या छापेमारीपूर्वी तीन महिन्यांपासून इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), एटीएस व एसआयटी या तीन विभागाची नजर होती. त्यांच्या संपर्कातील वारंवारता वाढल्यानंतर मोठी कृती होण्यापूर्वी व फॉलोअरची संख्या वाढण्यापूर्वी ही छापेमारी करण्यात आली आहे.
बँक खात्यात मोठी रक्कम आली का ? याचाही तपास फोनवर कितीदा संपर्क झाला याचाही तपास
या आठ संशयितांशीदोन्ही गँगकडून फोनद्वारे संपर्क झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीत फोनवर कितीवेळा संपर्क झाला? काय संवाद झाला. पुढे काय करणार होते? याबाबत प्रश्नांची सरबत्ती करून चौकशी करण्यात आली. यातून अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही. मात्र, आणखी चौकशी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील हल्ल्याच्या कटातून महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस
काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी पंजाब व दिल्लीतून भट्टीच्या ६ दहशतवादी हस्तकांना अटक केली. त्यांनी दिल्लीत अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचे कबूल केले. यासाठी दानिश ऊर्फ चांदमियाँ याला २० हजारांचे आमिष दिले होते, असेही समोर आले आहे.
कट्टरवादाकडे नेण्यासाठी ब्रेनवॉश केल्याचा संशय
भट्टी गँग ही फॉलोअरला कट्टरवादाकडे नेण्यासाठी ब्रेनवॉश करून सुरुवातीला छोटे टास्क देऊन नंतर अशा कट्टरवादी झालेल्या तरुणांना देशविघातक कृत्य करण्यासाठी पैसा पुरवून त्यांच्या माध्यमातून विघातक कृत्य घडवून आणते. त्यादृष्टीने संशयितांच्या बँक खात्यात गेल्या काही महिन्यांत मोठी रक्कम कोणाकडून आली आहे का? याचा शोध एटीएस घेत आहे.