Headlines

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात वाहतूक बदल:जिल्हाधिकारी कार्यालय, लष्कर भागात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (14 एप्रिल) पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लष्कर भागातील अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल आणि विश्रांतवाडी या प्रमुख भागांमध्ये वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर आणि उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या गर्दीमुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. गर्दी ओसरेपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. तसेच, आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौकमार्गे वळविण्यात आली आहे. पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूकही वळवण्यात आली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेसमार्गे जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक देखील वळविण्यात आली आहे. ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि इतर वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक आणि फोटो झिंको प्रेस उपरस्ता या ठिकाणी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी मिरवणुका निघणार असल्याने बाजीराव रस्ता, लाल महाल चौकातील गणेश रस्ता आणि नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्ता परिसरातील वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागात येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ आणि ससून कॉलनी येथे उभारावीत अशी व्यवस्था करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *