![]()
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात देवदर्शनाच्या नावाखाली सुरू असलेल्या काळाबाजार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे केवळ धार्मिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक लूट केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात समोर आला आहे. या प्रकरणाची सुरुवात भाविकांकडून आलेल्या तक्रारींनी झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी दर्शन’ मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. 11 एप्रिल रोजी पंचवटी येथील अनंता सुरेश मेहंदळे आणि त्यांचे मित्र दर्शनासाठी आले होते. त्यांनी अधिकृत 200 रुपयांचा पास घेतला होता. मात्र, रांगेत उभे असताना काही संशयितांनी त्यांना गाठून वेगळे आमिष दाखवले. रांगेतून दर्शनासाठी चार-पाच तास लागतील, पण आम्ही दहा मिनिटांत दर्शन घडवतो, असे सांगत या संशयितांनी भाविकांकडून थेट 3 हजार रुपये उकळले. विशेष म्हणजे मंदिरात अशी कोणतीही अधिकृत सशुल्क जलद दर्शन सुविधा नसतानाही ही फसवणूक केली जात होती. यानंतर अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि प्रकरण उघडकीस आले. तपासादरम्यान पोलिसांनी गोटीराम पेहरे आणि अभिषेक कडलग म्हणजेच पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातील एकाला अटक झाली असून दुसरा आरोपी फरार आहे. मात्र, पुढील चौकशीत या संपूर्ण रॅकेटचा संबंध थेट मंदिर संस्थानच्या विश्वस्तांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पुरुषोत्तम कडलग यांनाही अटक केली. यामुळे या घोटाळ्याचे मूळ संस्थानच्या आतपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, मंदिरात प्रवेशासाठी कडक नियम असून प्रत्येक भाविकाची नोंद ठेवली जाते. तरीही बाहेरील व्यक्ती पैसे घेऊन थेट दर्शनासाठी आत कसे नेत होते, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तपासात असेही समोर आले की, विश्वस्तांच्या नावाचा वापर करून किंवा त्यांची शिफारस दाखवून भाविकांना आत सोडले जात होते. स्टिंग ऑपरेशनद्वारे संपूर्ण प्रकार उघड नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, स्टिंग ऑपरेशनद्वारे संपूर्ण प्रकार उघड करण्यात आला. काही एजंट 3 हजार ते 12 हजार रुपये घेऊन भाविकांना जलद दर्शन देत होते. एका दिवशी 100 ते 150 भाविकांना अशा प्रकारे आत सोडले जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात विश्वस्तांचे नातेवाईक आणि एजंट अटकेत असून आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि सर्व पुरावे न्यायालयात सादर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
त्र्यंबकेश्वर दर्शनात काळाबाजाराचा स्फोट:शरद पवारांच्या पक्षाचे पुरुषोत्तम कडलग ताब्यात; स्टिंग ऑपरेशनद्वारे संपूर्ण प्रकार उघड