“भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ टीका करण्याचे काम करत आहेत. मुळात ज्यांनी देशाचे संविधान संपवण्याचा विडा उचलला आहे, जे दिवसाढवळ्या जनतेच्या मतांवर दरोडा टाकतात आणि त्या चोरलेल्या मतांच्या जोरावर सत्तेत येतात, तेच खरे गुन्हेगार आहेत. पंतप्रधान नरेंद्र
.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिका, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेविषयी निर्माण झालेला संशय, राहुल गांधींवरील बदनामीचे प्रयत्न, महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात आत्महत्या करणारे शेतकरी आणि फडणवीस सरकारने 12 कोटी रुपये खर्चून व्हीआयपींसाठी मंजूर केलेल्या आलिशान गाड्यांवरून राज्य व केंद्र सरकारचे वाभाडे काढले.
32 कोटी मते कमी करण्याचे महापाप
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींवर प्रश्न उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले, “निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्धीकरणाच्या नावाखाली (SIR) आणि फॉर्म क्रमांक 6च्या फेरबदलातून देशातील तब्बल 32 कोटी मतदारांची मते कमी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. विशिष्ट जाती आणि धर्माच्या लोकांची नावे याद्यांमधून जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत. नवी मुंबईत वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 25 बोगस मतदारांची नोंद झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत.”
सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर प्रश्न
“सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला विचारणा केली होती की, फॉर्म 6 मध्ये बदल करण्यास किंवा एसआयआर करण्यास आयोगाला कोणी सांगितले होते? न्यायालयाने असे आदेश दिले नसतानाही आमचे नाव का वापरले जात आहे, असा सवाल केला होता. मात्र, त्यानंतरही ज्ञानेश कुमारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय जनतेच्या मनात येत आहे. स्वायत्त संस्था सत्तेत बसलेल्या मोदी-शहांच्या दबावाखाली काम करत आहेत का? जर सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारे संशयास्पद मार्ग काढत असेल, तर त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.”

स्वातंत्र्यलढ्यासारखा देशव्यापी उठाव होणार
“राहुल गांधी आज दुपारी 4 वाजता ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करतील. राहुल गांधींनी जात-पात आणि पक्ष बाजूला ठेवून मतचोर सत्तेतून हाकलण्याचे आवाहन केले आहे. आता केवळ जंतरमंतर नव्हे, तर संपूर्ण देशच ‘जंतरमंतर’ झाला आहे. इंग्रजांनी गोळ्या घातल्या तरी लोक मागे हटले नव्हते; आताही जनता फासावर जायला तयार आहे, पण ही लढाई आरपार लढणार.”
राक्षसांचा संहार करण्यासाठीच शिवतांडव
विरोधकांच्या आंदोलनाला भाजप नेत्यांनी हिंसक म्हटल्याचा समाचार घेताना पटोले म्हणाले, “भगवान शंकराने केलेले तांडव हे बेइमान, लुटारू आणि अत्याचारी राक्षसांचा संहार करण्यासाठी होते. आजच्या लोकशाहीत जनतेचे हक्क लुटणाऱ्या, रामाची दक्षिणा आणि राम मंदिराचे पैसे लाटणाऱ्या आधुनिक राक्षसांविरोधात राहुल गांधींनी पुकारलेला संघर्ष म्हणजे शिवतांडवच आहे. अत्याचाराविरोधात तांडव करणे हे पाप नाही. देवाचा आणि धर्माचा ठेका केवळ भाजपने घेतलेला नाही. आम्हीही कट्टर शिवभक्त आणि रामभक्त आहोत.”
महिला पत्रकाराच्या धक्काबुक्कीवरून भाजपचा कांगावा
“काल आंदोलनात राहुल गांधींना स्वतःला प्रचंड धक्काबुक्की होत होती. पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. अशा गर्दीत स्वाभाविकपणे बाजूला होण्याचा प्रयत्न करताना झालेल्या घटनेचे भांडवल करून भाजप राहुल गांधींना बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आणि संघाच्या गुंडांनी रस्त्यावर उतरून तरुण मुलींना ज्या निर्घृणपणे मारहाण केली, त्या गुंडगिरीवर भाजप तोंड का उघडत नाही?”
महाराष्ट्रात 46 लाख बोगस मते वाढवली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीतील संशयास्पद आकडेवारीवर नाना पटोले यांनी स्फोटक आरोप केले. “लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार-पाच महिन्यांत महाराष्ट्रात 46 लाख मतदारांची संख्या अचानक कशी वाढली? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेनंतर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत तब्बल 10 टक्क्यांची वाढ कशी झाली? ती मते कोणत्या बूथवर पडली, याचे सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग का नकार देत आहे? कारण केंद्र सरकारने कायदे बदलून फुटेज लपवण्याचे पाप केले आहे. फडणवीस सरकार हे जनतेच्या मतांवर नाही, तर मतांच्या चोरीवर निवडून आलेले बेकायदेशीर सरकार आहे.”
ठाकरे बंधूंचा मोर्चा आणि मविआची एकजूट
“मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोर्चांवरून महाविकास आघाडीत फूट असल्याचा संभ्रम पसरवू नये. ही लोकशाही रक्षणाची लढाई आहे. राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे की, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या युद्धात उतरावे. आम्ही सर्वजण एकाच ध्येयाने एकत्र आहोत.”
एका महिन्यात 27 शेतकरी आत्महत्या; फडणवीस सरकारवर गुन्हे दाखल करा!
राज्यातील गंभीर दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. “एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात 27 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत राज्यात 276 हून अधिक बळीराजांनी जीवन संपवले. एका एका दिवशी अनेक शेतकरी गळफास घेत आहेत. पिकं करपली आहेत, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची आणि अलनिनोची कबुली विधानसभेत दिली होती; मग कृत्रिम पाऊस का पाडला नाही? पाणी साठवण टाक्या का भरल्या नाहीत? आम्ही तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, पण सरकार पळून गेले. या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी केवळ आणि केवळ असंवेदनशील फडणवीस सरकार जबाबदार असून यांच्यावर 302 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत.”
57 टक्के कमिशनचे सरकार; कंत्राटदारांच्या आत्महत्या: “कर्नाटकातील भाजप सरकार 40 टक्के कमिशनचे होते; मात्र महाराष्ट्रातील महायुती सरकार 57 टक्के कमिशन घेते, असा थेट आरोप खुद्द कोल्हापूरच्या आंदोलनात सरकारी कंत्राटदारांनी केला आहे. कंत्राटदारांची तब्बल 96 हजार कोटींची बिले थकली आहेत. गेल्या 10 महिन्यांत 9 शासकीय कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या असून ते 19 तारखेपासून बेमुदत संपावर जात आहेत.”
वसुली गुंडांना राजाश्रय
“अकोल्यात कर्जवसुलीसाठी आलेल्या फायनान्स कंपन्यांच्या गुंडांनी महिलांचे फोटो काढले. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत नाहीत, कारण विमा कंपन्यांचे मालक हे मोदींचे लाडके मित्र आहेत. कंपन्यांकडून कमिशन लाटणारे हे सरकार सर्वसामान्यांचे रक्त पिणारे ठरले आहे.”
शेतकरी मरतोय अन् 12 कोटींच्या गाड्यांची उधळपट्टी!
शासनाच्या अवाजवी उधळपट्टीवर ताशेरे ओढताना पटोले म्हणाले, “राज्यावर कर्जाचा डोंगर असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना व्हीआयपींच्या नावाखाली 44 आलिशान गाड्यांसाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हे पैसे कोणासाठी? सत्तेत बसताना घटनात्मक पदांवर राहून ज्यांनी भाजपला मदत केली, त्या रश्मी शुक्लांसारख्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या बडेजावपणासाठी आणि सेवेसाठी जनतेचा पैसा लुटला जात आहे.”
नाशिक कुंभमेळ्यात 34 हजार कोटींचा भ्रष्टाचार
“नाशिक कुंभमेळ्यासाठी 34 हजार कोटींचे बजेट मंजूर करून रोज भ्रष्टाचाराची नवी प्रकरणे बाहेर येत आहेत. धर्माच्या आणि कुंभमेळ्याच्या नावावरही भ्रष्टाचार करणारे हे निर्लज्ज सरकार आहे. स्वयंपाकघरातील 42 पैकी 41 वस्तूंचे भाव दुप्पट झाले आहेत. महागाईवर नियंत्रण नाही, तरुणांना रोजगार नाही. जर देश विश्वगुरू झाला आहे, तर 80 कोटी जनतेला 5 किलो मोफत धान्यावर का जगवावे लागत आहे? जनतेचे रक्त पिणाऱ्या या हुकूमशाही व्यवस्थेला आता देशातील जनताच धडा शिकवेल,” असा इशारा नाना पटोले यांनी शेवटी दिला.
—————————————————————
हेही वाचा….
VIP वाहन खरेदीवरून अतुल लोंढेंची टीका: म्हणाले- बायकोचे मंगळसूत्र विकले तरी चालेल, पण स्वतःचे शौक पूर्ण करणार; हेच फडणवीस सरकारचे धोरण

“राज्यातील शेतकरी आज तीव्र दुष्काळाने होरपळत आहे, पदवीधर तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र कर्जाच्या प्रचंड डोंगराखाली दबला आहे. असे असताना राज्यकर्त्यांच्या दिमतीसाठी जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या खरेदी केल्या जात आहेत. ‘बायकोचे मंगळसूत्र विकायला लागले तरी चालेल, पण मी माझे शौक पूर्ण करणार’ अशाच विकृत मानसिकतेतून फडणवीस सरकारचा हा कारभार सुरू आहे. सरकारने या गाड्यांची खरेदी तत्काळ रद्द करून तो सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे वळवावा, अन्यथा जनतेचा संताप रस्त्यावर दिसेल आणि या गाड्या रस्त्यावर फोडल्याशिवाय राहणार नाहीत,” असा घणाघाती आणि आक्रमक इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी