Headlines

'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, समोरच्यांची लायकी कळेल':पुणे पदवीधर निवडणुकीत जयंत पाटलांचे खुले आव्हान; मविआने प्रचाराचे रणशिंग फुंकले




पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा जाधव-देशमुख, तर शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे कौतुक केले तसेच त्यांना विजयी करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, हर्षदा जाधव देशमुख यांचे शिक्षण संस्था आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे वडील सनदी अधिकारी होते, तर सासरे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी भक्कम आहे. तसेच हर्षदा यांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अशाच अभ्यासू प्रतिनिधीची विधानपरिषदेत गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा’ यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भाषण केले. ते म्हणाले, आपल्या उमेदवाराची भाषणशैली आणि काम करण्याची पद्धत उत्तम आहे. मी आव्हान देतो की शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा आणि तिथे उमेदवारांचे बोर्ड लावा. समोरच्या पक्षाच्या उमेदवारांची काय लायकी आहे, हे जनतेसमोर स्पष्ट होऊ द्या. हाच आपला खरा प्रचार ठरेल, असे थेट आव्हान पाटील यांनी केले आहे. भाजपचा मित्रांवरच विश्वास नाही- जयंत पाटील पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, आज भाजपने निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांनी निरीक्षक कुठे नेमले? तर जिथे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत, तिथल्याच बूथवर भाजपचे निरीक्षक आहेत. याचा अर्थ भाजपचा आपल्याच मित्रांवर विश्वास नाही, असा टोलाही पाटील यांनी बोलताना लगावला. तसेच उमेदवारी न मिळाल्याने भाजपसोबत गेलेल्या शरद लाड यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, उमेदवारी मिळेल म्हणून आमच्याकडील उमेदवार तिकडे गेले, आता ते तिकडे पूर्णपणे गांगरून गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ‘शिक्षक आणि पदवीधर मतदार भाजपला योग्य उत्तर देतील’ मागील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी मिळवलेल्या विजयाचा दाखला देत, याही वेळी मतदार जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, देशात सध्या बदलाचे वारे वाहत असून या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार भाजपला निश्चितच योग्य ते उत्तर देतील, असा ठाम दावाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *