![]()
फळा स्पष्ट दिसत नसल्यामुळे अभ्यासात मागे पडणाऱ्या, वाचन करताना अडचणी येणाऱ्या किंवा दृष्टीदोषामुळे आत्मविश्वास गमावणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत नेत्रोपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत पुढील 3 वर्षांत मुंबईतील महापालिकेच्या 1,200 शाळांमधील 3 लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोषाचे वेळीच निदान करून त्यांना चष्मे, तज्ज्ञ उपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमाचा भर आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर 2026 या कालावधीत या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या 227 शाळांमधील 40,270 विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. संबंधित शाळांमधील एकूण 59,150 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 68 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत तपासणीची सुविधा पोहोचली आहे. तपासणीदरम्यान गंभीर दृष्टीदोष, मोतीबिंदू, तिरळेपणा आणि रंगदृष्टीदोष यांसारख्या समस्या समोर आल्या आहेत. आतापर्यंत 361 विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले असून, चार विद्यार्थ्यांवर तिरळेपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. दृष्टीदोषामुळे अभ्यासात अडथळे; लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता लहान मुलांना आपल्याला स्पष्ट दिसत नसल्याची जाणीव असली, तरी नेमकी अडचण काय आहे, हे अनेकदा सांगता येत नाही. काही विद्यार्थी फळ्यावरील मजकूर वाचण्यासाठी पुढील बाकावर बसण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण वाचन टाळतात किंवा फळ्यावरील मजकूर उतरविण्यासाठी अधिक वेळ घेतात. अशा वर्तनाचा संबंध दृष्टीदोषाशी असू शकतो; मात्र अनेकदा त्याकडे अभ्यासातील दुर्लक्ष किंवा एकाग्रतेचा अभाव म्हणून पाहिले जाते. हीच बाब लक्षात घेऊन ‘बाल दृष्टी’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये नियमित नेत्रतपासणी करून विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोषाचे वेळीच निदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः अपवर्तनदोषाचे निदान आणि उपचार यावर या उपक्रमाचा भर आहे. हा उपक्रम आयुष्मान भारतअंतर्गत शालेय आरोग्य व कल्याण कार्यक्रमाशी संलग्न आहे. शाळेतील शिक्षक, आरोग्य पथके आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळवून देण्याचे काम केले जात आहे. देशातील लाखो मुलांना दृष्टीदोषाचा धोका बालवयातील दृष्टीदोष ही केवळ आरोग्याची समस्या नसून त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर, सामाजिक वर्तनावर आणि भविष्यातील संधींवरही होतो. उपलब्ध माहितीनुसार, देशात अंदाजे 93 लाख मुले दृष्टीबाधित आहेत. ‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या 2022 मधील अभ्यासानुसार, बालअंधत्वामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे सुमारे 1,300 कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष नुकसान होते. अपवर्तनदोष आणि ॲम्ब्लायोपिया ही बालवयातील दृष्टीदोषाची महत्त्वाची कारणे आहेत. यापैकी अनेक समस्या वेळेत निदान करून योग्य उपचार केल्यास टाळता येऊ शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येते. त्यामुळे शालेय स्तरावरच नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांना वेळेत चष्मे मिळाल्यास त्यांना वर्गातील फळा वाचणे, पुस्तके वाचणे आणि शिकविलेला अभ्यास समजून घेणे सोपे होऊ शकते. 227 शाळांमधील 40,270 विद्यार्थ्यांची तपासणी ‘बाल दृष्टी’ उपक्रमांतर्गत फेब्रुवारी ते सप्टेंबर 2026 या आठ महिन्यांत 227 महापालिका शाळांमधील 40,270 विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी पूर्ण झाली. या तपासणीत 20,390 मुले आणि 19,880 मुलींचा समावेश आहे. मुलगे आणि मुली या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांचा सहभाग जवळपास समान राहिला आहे. संबंधित शाळांमधील एकूण 59,150 विद्यार्थ्यांपैकी 68 टक्के विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे. या प्राथमिक टप्प्यातील तपासण्यांमधून काही विद्यार्थ्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे दृष्टीदोष असल्याचे आढळले. त्यामुळे शाळांमधील नेत्रतपासणी केवळ चष्म्याची गरज ओळखण्यापुरती मर्यादित न राहता, दुर्लक्षित राहू शकणाऱ्या नेत्रविकारांचे निदान करण्यासाठीही उपयुक्त ठरत आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये गंभीर निकटदृष्टीदोष तपासणीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या एका डोळ्यात उणे 11.50 एसपीएच इतका निकटदृष्टीदोष आढळला, तर काही विद्यार्थ्यांच्या नोंदी उणे 16 एसपीएचपर्यंत असल्याचे समोर आले. दृष्टीमापनातील एसपीएच म्हणजे गोलाकार लेन्सच्या शक्तीचे मापन होय. उणे मूल्य सामान्यतः निकटदृष्टीदोष दर्शवते. दृष्टीदोषाची तीव्रता वाढल्यास दूरवरील वस्तू, फळ्यावरील अक्षरे आणि वर्गातील मजकूर स्पष्ट दिसण्यात अडचणी येऊ शकतात. या तपासणीमध्ये एका विद्यार्थ्याला मोतीबिंदू असल्याचेही निदान झाले. लहान वयात आढळणाऱ्या अशा समस्यांकडे वेळेत लक्ष न दिल्यास मुलांच्या दृष्टीविकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्राथमिक तपासणीत संशयित नेत्रविकार आढळलेल्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येते. 361 विद्यार्थ्यांना चष्मेवाटप; चार विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया नेत्रतपासणीमध्ये दृष्टीदोष आढळल्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ निदानापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष उपचार मिळावेत, यासाठी उपक्रमांतर्गत पाठपुरावा केला जात आहे. आतापर्यंत 361 विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले आहेत. संशयित नेत्रविकार असलेल्या विद्यार्थ्यांना ताडदेव रोडवरील व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कम्युनिटी आय क्लिनिकमध्ये सविस्तर तपासणीसाठी पाठविण्यात येते. या तपासणीनंतर संबंधित विद्यार्थ्याला चष्म्याची आवश्यकता आहे की तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, हे निश्चित केले जाते. उपचार पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांशी घरभेटी आणि शाळाभेटींच्या माध्यमातून संपर्क ठेवण्यात येतो. आवश्यक उपचार घेण्यासाठी पालकांना मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत चार विद्यार्थ्यांवर तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रंगदृष्टीदोषाचेही निदान; शिक्षकांना अध्यापनात बदल करता येणार उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 31 विद्यार्थ्यांना रंगदृष्टीदोष असल्याचे आढळले. रंगदृष्टीदोष सामान्यतः पूर्णपणे दुरुस्त करता येत नसला, तरी त्याचे वेळीच निदान झाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर मदत करणे शक्य होते. रंगांमधील फरक ओळखण्यात अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना अध्यापनपद्धतीत आवश्यक बदल करता येतात. उदाहरणार्थ, केवळ रंगांच्या आधारे माहिती समजावून सांगण्याऐवजी अक्षरे, चिन्हे किंवा इतर दृश्य संकेतांचा वापर करता येतो. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि करिअरविषयक निवडींसाठीही ही माहिती उपयुक्त ठरू शकते. वेदांतच्या आयुष्यात आला आत्मविश्वासाचा प्रकाश ‘बाल दृष्टी’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल लोअर परळ येथील गणपतराव कदम महापालिका शाळेत चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षीय वेदांत नेरुळकरच्या उदाहरणातून समोर आला आहे. वेदांतला पहिल्या बाकावर बसूनही वर्गातील फळा स्पष्टपणे वाचता येत नव्हता. तिरळेपणामुळे त्याला शिकविलेले धडे समजून घेण्यात अडचणी येत होत्या. याचा परिणाम त्याच्या वर्गातील सहभागावरही झाला होता आणि तो अधिक अबोल झाला होता. ‘बाल दृष्टी’ उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत वेदांतची समस्या निदर्शनास आली. त्यानंतर जुलै महिन्यात त्याच्यावर विनामूल्य तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याला फळा स्पष्टपणे वाचता येऊ लागला. शिकविलेले धडे समजून घेऊन तो प्रश्नांची उत्तरेही देऊ लागला. वेदांतच्या आईनेही मुलामध्ये झालेल्या बदलाबद्दल समाधान व्यक्त केले. आता त्याला स्पष्ट दिसत असून, तो अडचणींशिवाय शिकत आहे आणि मित्रांमध्ये अधिक आत्मविश्वासाने वावरत आहे, असे त्यांनी सांगितले. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासातही सुधारणा होऊ शकते, हे या उदाहरणातून स्पष्ट होते. उपचारांसाठी पाठविलेल्या विद्यार्थ्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा नेत्रतपासणीमध्ये संशयित विकार आढळल्यानंतर पुढील उपचारांसाठी 1,950 विद्यार्थ्यांना संदर्भित करण्यात आले आहे. त्यापैकी 549 विद्यार्थी, म्हणजे सुमारे 28 टक्के विद्यार्थी, आतापर्यंत संबंधित दवाखान्यात पुढील तपासणीसाठी पोहोचले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पालकांशी संपर्क आणि पाठपुरावा अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. यापुढे विद्यार्थ्याची शाळेत प्राथमिक तपासणी झाल्यापासून पुढील तपासणी, चष्मावाटप आणि आवश्यक उपचार पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचा मागोवा घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. घरभेटी आणि शाळाभेटींच्या माध्यमातून पालकांशी सातत्याने संवाद साधून उपचारांमधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तीन वर्षांत 1,200 शाळांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बाल दृष्टी’ उपक्रमांतर्गत नेत्रतपासणी, संदर्भसेवा आणि घरभेटींद्वारे उपचारांसाठी पाठपुरावा करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पथकांच्या कामाची दखल घेतली आहे. पुढील 3 वर्षांत महापालिकेच्या 1,200 शाळांमधील 3 लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून निश्चित करण्यात आले आहे. फळा दिसत नसल्यामुळे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण ही अभ्यासातील अनास्था समजण्याऐवजी त्यामागील संभाव्य दृष्टीदोष ओळखणे, त्यांना वेळेत योग्य उपचार मिळवून देणे आणि उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे, ही या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. शालेय वयातच नेत्रआरोग्याची काळजी घेतल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे ‘बाल दृष्टी’ उपक्रम महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही महत्त्वाचा ठरत आहे. हेही वाचा… ‘शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, समोरच्यांची लायकी कळेल’:पुणे पदवीधर निवडणुकीत जयंत पाटलांचे खुले आव्हान; मविआने प्रचाराचे रणशिंग फुंकले पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा जाधव-देशमुख, तर शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करत प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सविस्तर वाचा….
Source link
‘बाल दृष्टी’ उपक्रमातून मुंबईतील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्रआरोग्याला नवी दृष्टी:3 लाख मुलांच्या तपासणीचे उद्दिष्ट