Headlines

सचिन हनमघर यांच्या 'बी हॅप्पी' पुस्तकाचे प्रकाशन:भयभीत युवा पिढीसाठी 'बी हॅप्पी'चा मंत्र उपयुक्त – भारत सासणे




आजची पिढी एका अर्थाने भयभीत आहे. आज काय घडते आहे; उद्या काय होणार याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ‘बी हॅप्पी’चा मंत्र नक्कीच उपयुक्त ठरेल. तुम्ही आनंदी असाल तर इतरांना देखील आनंदी करू शकता आणि त्यातूनच समाज आनंदाच्या एका विशिष्ट वलयामध्ये जगू लगतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांनी केले. दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि सचिन हनमघर लिखित ‘बी हॅप्पी’ कथासंग्रहाचे प्रकाशन भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रा. रेखा इनामदार-साने, डॉ. सतिश देसाई, बंडा जोशी आणि दिलीपराज प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बर्वे मंचावर होते. कर्वेनगर येथील युनायटेड वेस्टर्न सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत सासणे पुढे म्हणाले, ‘बी हॅप्पी’ या पुस्तकाचे लेखक हनमघर यांनी त्यांच्या कथांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे उपलब्ध करून देत घटनांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. त्यांच्या कथांमध्ये पात्रयोजनेतील सहजता तसेच गुंतागुंतीचे नाट्य मांडण्याची तयारी, सकारात्मकता आणि प्रसंग मांडण्यामागील बुद्धीमत्ता प्रकर्षाने जाणवते. भाषा अतिशय सहज व प्रभावी आहे. अशा कथांमधील सकारात्मकता आणि आशावादाची समाजात आवश्यकता आहे. वास्तवाचा वापर करताना हमनघर यांनी भावनात्मक नाट्यमयताही जपली आहे. लेखनाविषयी बोलताना सचिन हनमघर म्हणाले, ‘बी हॅप्पी’मधील कथांमधून विविध व्यक्तीरेखा जाणून घेत समाजातील घटना, विकृती, अनुभूती यांचा अभ्यास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात छोटे-छोटे बदल घडवित सकारात्मकता पेरता येते हे या कथांचे बीज आहे. समीक्षात्मक टिपण्णी करताना प्रा. रेखा इनामदार-साने म्हणाल्या, साहित्यकृतींमधून गंभीर विषय लिहिणे, दु:ख मांडणे सोपे असते. परंतु सुख, समाधान, आनंद मांडणे अत्यंत अवघड असते. सचिन हनमघर यांच्या कथांमधून समाजातील सर्व वयाच्या, स्तराच्या, वेगवेगळ्या भावविश्र्वात वावरणाऱ्या व्यक्तीरेखांचा समावेश आहे. आपले संचित घेऊन जगताना आयुष्य सहजतेने जगता येत नाही. परंतु अशा परिस्थितीतही जगण्याशिवाय गत्यंतर नसते. अशी अनपेक्षित धक्के खाणारी अनेक पात्रे त्यांच्या कथांमधून सौम्य नाट्य रंगवत समोर येतात. या कथांमधून सरळ रेषीय सौंदर्य जाणवते. डॉ. सतीश देसाई म्हणाले,आपल्या आयुष्यात सकारात्मकता महत्त्वाची आहे. ‘बी हॅप्पी’च्या माध्यमातून कथेचा मूळ गाभा न सोडता सकारात्मक पद्‌धतीने लिखाण झालेले दिसून येते. निराशात्मकता आणि नकारात्मकता साचलेल्या काळात या कथा आशेचा किरण निर्माण करत आहेत.‘बी हॅप्पी’ हे पुस्तक सकारात्मकता आणि विधायक दृष्टीकोन देणारे असून जगण्याचा मार्ग दर्शविते असे बंडा जोशी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *