Headlines

हिंगोलीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर मोठी कारवाई:22 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जणांवर गुन्हे दाखल




हिंगोली जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. हट्टा आणि औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत अवैध मुरूम आणि वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण २२.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर मंगळवारी ता. 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील एका पेट्रोलपंपासमोर टिप्पर मधून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार भुजंग कोकरे, नितीन गोरे, साईनाथ कंठे, इंगोले, यांच्या पथकाने मंगळवारी ता. 14 पहाटेच्या सुमारास वाहनांची तपासणी केली. यामध्ये एका टिप्परची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिसांनी टिप्पर व वाळू असा 14.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार कोकरे यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक अंबादास राम राठोड (रा. शिरकुटी ता. जि. वाशिम) टिप्पर मालक अक्षय भुसांडे (रा. हिंगोली) यांच्या विरुध्द औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल इंगोले पुढील तपास करीत आहेत. या सोबतच अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतुकीच्या अन्य एका घटनेमध्ये वसमत तालुक्यातील बाराशिव ते करंजाळा मार्गावर तलाठी गजानन शिंदे यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. यामध्ये एका ट्रॅक्टरमधून अवैधरित्या मुरूम वाहतूक केला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून ट्रॅ्क्टर व मुरुम असा 8.02 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तलाठी शिंदे यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलिस ठाण्यात चालक राजू कदम, अर्जुन कदम यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *