Headlines

काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो?:भाजप प्रदेशाध्यक्षांनी टोचले भाजयुमोचे कान, रवींद्र चव्हाण म्हणाले- गुंड तयार करायचे नाहीत




मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबईत केलेल्या आंदोलनावरून आता भाजपमध्येच नाराजीचे सूर उमटले आहेत. भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत थेट कानपिचक्या दिल्या. ‘काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण त्याविरोधात आंदोलन करतो, हे चुकीचे आहे,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी अमित ठाकरेंविरोधातील आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. युवाशक्तीचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे, युवकांना शिक्षित आणि सक्षम करायचे आहे, त्यांना गुंड म्हणून तयार करायचे नाही, असा स्पष्ट संदेश चव्हाण यांनी दिला. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी अमित ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनच लगाम घालण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आंदोलन करण्याची गरज नव्हती मुंबईतील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या अलीकडील आंदोलनाचा थेट संदर्भ घेतला. कोणीतरी नुकताच राजकारणात आलेला तरुण काही बोलतो आणि त्याच्या वक्तव्याच्या विरोधात लगेच आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण म्हणाले की, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकरणात आंदोलन करण्यापूर्वी त्यामागची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने काम करून युवाशक्तीला अडचणीत आणायचे नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘मी स्वतः कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे. मला युवाशक्तीला कुठेही अडचणीत आणायचे नाही. आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, गुंड म्हणून तयार करायचे नाही,’ असे चव्हाण यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले. कृष्णराज महाडिक यांच्या आंदोलनावरून दुहेरी नामुष्की? अमित ठाकरे यांच्याविरोधात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला होता. मात्र या आंदोलनाला अपेक्षित स्वरूप मिळाले नाही. त्यानंतर आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच आंदोलनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने महाडिक यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी भाजप युवा मोर्चाने मुंबईत हालचाली सुरू केल्या होत्या. मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनीही खबरदारी घेतली. महाडिक आणि भाजयुमो कार्यकर्ते शिवतीर्थपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना माहीम परिसरात ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलन प्रत्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू शकले नाही. आता या आंदोलनावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच नाराजी व्यक्त केल्याने महाडिक यांच्या भूमिकेवर भाजपमध्येच प्रश्न उपस्थित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमका वाद कशावरून सुरू झाला? या संपूर्ण वादाची सुरुवात पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील एका घटनेपासून झाली. अमित ठाकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी पुण्यात गेले होते. कॅन्टीनमधील जेवणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा तसेच खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला. याच वेळी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. अमित ठाकरे यांनी यावर आक्षेप घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावण्यात आला, असा सवाल केला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मोदींचा फोटो खाली उतरवण्यात आला. या घटनेनंतर भाजपकडून अमित ठाकरे यांच्यावर टीका सुरू झाली. प्रकरण वाढत गेले आणि अखेर भाजप युवा मोर्चाने अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मनसे-भाजप आमनेसामने अमित ठाकरे यांच्याविरोधात भाजयुमो आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसे कार्यकर्तेही सक्रिय झाले. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भाजप युवा मोर्चाला थेट आव्हान दिले होते. भाजयुमोला शिवतीर्थपर्यंत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना माहीम परिसरातच ताब्यात घेतले. दादर आणि शिवाजी पार्क परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र मोठा संघर्ष टाळण्यात पोलिसांना यश आले. रवींद्र चव्हाणांचा संदेश नेमका कुणासाठी? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकारिणी बैठकीत केलेले वक्तव्य केवळ एका आंदोलनावरील नाराजी म्हणून पाहायचे की पक्षाच्या युवा संघटनेच्या कामकाजासाठी दिलेला व्यापक संदेश, याची चर्चा आता सुरू झाली आहे. युवा मोर्चाने प्रत्येक राजकीय वक्तव्याला आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्याऐवजी पक्षाची भूमिका, आंदोलनाचा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे राजकीय समीकरण यांचा विचार करावा, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. विशेष म्हणजे भाजप आणि मनसे यांच्यात सध्या विविध राजकीय मुद्द्यांवर जवळीक निर्माण होत असताना युवा मोर्चाच्या या आंदोलनामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चव्हाण यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून युवा मोर्चाला दिलेल्या या कानपिचक्यांना राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. अमित ठाकरेंच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता भाजपच्या घरात अमित ठाकरे यांनी महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यास सांगितल्याने सुरू झालेला वाद काही तासांतच भाजप विरुद्ध मनसे संघर्षात बदलला. भाजयुमोने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची तयारी केली. मनसेनेही त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी केली. मात्र आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच त्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात भाजपची अधिकृत भूमिका आणि युवा मोर्चाची आक्रमक भूमिका यामध्ये काहीसा फरक असल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आंदोलनातून निर्माण होणारा अनावश्यक संघर्ष टाळायचा आहे का, याबाबतही राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. अमित ठाकरे यांच्या एका कृतीपासून सुरू झालेल्या या वादाने त्यामुळे आता नवा राजकीय वळण घेतले आहे. मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील संघर्षापेक्षा भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या युवा संघटनेलाच जाहीरपणे दिलेला इशारा हा सध्या या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. हेही वाचा… डाकूंच्या मदतीने बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण चोरलं!: संजय राऊत म्हणाले- चिन्ह गोठवण्याची वेळ शिंदेंमुळेच आली; निकाल लागल्यावर त्यांना स्वत:चीच लाज वाटेल! शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांच्या निर्णयांवर कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे प्रश्न उपस्थित केले आहेत. आता शिंदे गटाने कितीही मोठे वकील उभे केले तरी अंतिम निर्णय घटनापीठाला संविधानाच्या चौकटीतच द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *