Headlines

पंडित सुरेश तळवलकर यांच्या 'आवर्तन' ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन:लेखणी कागदावर उतरल्यावर ग्रंथ बनतो, इतिहास रचला जातो- पद्मश्री शेखर सेन




पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. संगीत नाटक अकादमीचे माजी संचालक, ज्येष्ठ कलावंत पद्मश्री शेखर सेन यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना सेन म्हणाले की, लेखणी कागदावर अंकित होते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो आणि इतिहास रचला जातो. तालयोगी आश्रम, आवर्तन गुरुकुल आणि अभिजात अकादमीतर्फे मयूर कॉलनीतील एमईएस ऑडिटोरियम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावर, डॉ. सदानंद बोरसे आणि पुस्तकाच्या अनुवादक विद्याहरि देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सेन पुढे म्हणाले की, सृष्टीचे चलन आवर्तनातूनच होते आणि कलाकार हा संस्कृतीचा प्रतिनिधी असतो. भूतकाळातून ज्ञानकलश शोधले जातात तेव्हा कलेची उन्नती साधली जाते. ज्ञान ग्रहण करण्यासाठी ग्रंथांची आवश्यकता असते. पंडित सुरेश तळवलकर यांच्या लेखणीतून संगीत क्षेत्रातील भ्रामक संकल्पना दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, कला प्रवाहित ठेवण्याचे कार्य कलाकार निरंतर करत असतो. संगीत कलेच्या माध्यमातून निराशा आणि आत्म्यातील मलिनता दूर केली जाऊ शकते. निरंतर कला साधनेतून परंपरेत योग निर्माण करणाऱ्याला ‘तालयोगी’ म्हटले जाते. मृत चर्मात प्राणप्रतिष्ठा करण्याचे कार्य तालयोगी पंडित सुरेश तळवलकर करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पुस्तक लेखनाविषयी बोलताना पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक माझ्या हातून लिहिले गेले असले तरी यातील संकल्पना आणि विचार बुजुर्गांचेच आहेत. हे विचार मला पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. ‘आवर्तन’ म्हणजे केवळ पुनरावृत्ती नव्हे, तर पूर्णत्व झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात होय. या पुस्तकाच्या माध्यमातून गुरूंचे विचार संपूर्ण भारतात प्रसृत होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांनी सांगितले की, भारतीय अभिजात संगीताचा प्रसार जगभरात झाला आहे. हे पुस्तक संगीत क्षेत्राकडे कसे पहावे आणि पुढे जाण्यासाठी काय करावे, याविषयी मार्गदर्शन करेल. डॉ. सदानंद बोरसे म्हणाले की, ‘आवर्तन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या वाट्याला आलेला अनमोल दागिना आहे. पंडित सुरेश तळवलकर यांचे तबला-डग्ग्याइतकेच त्यांच्या वाणी आणि लेखणीवरही प्रभुत्व आहे. या पुस्तकाची मांडणी सुबोध शैलीत केलेली असून, यातील आठवणी आणि किस्स्यांमधून सांगीतिक विचार पोहोचवले जात आहेत. मराठीतील विचारधन सीमित न राहता, त्याचा परिघ मोठा व्हावा या हेतूने हिंदी आवृत्तीची निर्मिती झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *