![]()
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी पक्षातील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीला कायदेशीर नोटीस बजावत थेट आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनात मैदानात उतरत पक्षातील विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच राहतील! विरोध करणारा सच्चिदानंद बाबा कुणाच्या जिवावर नोटीस पाठवतोय हे शोधावेच लागेल, असे म्हणत मिटकरींनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून पक्षातील अंतर्गत विरोधकांचा ‘अतृप्त आत्मे’ असा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळत आहे आणि या नेतृत्वाची वाटचाल अजित पवारांच्या विचारांवर उत्तम सुरू आहे. मग हे पक्षातील अतृप्त आत्म्यांना कसे सहन होईल बरे? सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला पक्षातूनच विरोध होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘झारखंड कनेक्शन’वरून तटकरे-पटेल गटाला इशारा? आपल्या ट्विटमध्ये पुढे बोलताना मिटकरी यांनी अत्यंत सूचक इशारा दिला आहे. जर या प्रकरणाचे ‘झारखंड कनेक्शन’ महाराष्ट्रात निघाले, तर अजितदादांचे तळागाळातील कार्यकर्ते या झारीतील शुक्राचार्यांना तळागाळात नेऊन टाकतील हे अधोरेखित करून ठेवा. होय, राष्ट्रीय अध्यक्षच! अशा शब्दांत त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिटकरीचे ट्विट काय? अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच ! विरोध करणारा सचिदानंद बाबा कुणाच्या जिवावर नोटीस पाठवतोय हे तर शोधावेच लागेल.राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळत आहे आणि या नेतृत्वाची वाटचाल दादांच्या विचारावर उत्तम होते आहे हे पक्षातील अतृप्त आत्म्याना कसे सहन होईल बरे? पण झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर अजितदादांचे “तळागाळातील”कार्यकर्ते या झारीतील शुक्राचार्याना “तळागाळात”नेऊन टाकतील हे अधोरेखित करून ठेवा. होय राष्ट्रीय अध्यक्षच असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे तटकरे-पटेंलावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे राहतील असे मानले जात होते. मात्र, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर आव्हान देणारी नोटीस पाठवल्याने पक्षात राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या कायदेशीर नोटिसीमुळे पक्षात प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध पवार कुटुंब असा उघड संघर्ष सुरू झाला असून, मिटकरींच्या या वादळी ट्विटमुळे आता या वादात आणखी तेल ओतले गेले आहे.
Source link
झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर कार्यकर्ते शुक्राचार्याना “तळागाळात”नेऊन टाकतील:अमोल मिटकरी यांचा अप्रत्यक्ष तटकरे-पटेलांना इशारा