Headlines

दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल 29.53 टक्के जाहीर:नाशिक विभाग अव्वल, मुंबई-कोकणची कामगिरी निराशाजनक




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या जून-जुलै 2026 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेचा निकाल 29.53 टक्के लागला आहे. राज्यभरातून नोंदणी केलेल्या 52,880 विद्यार्थ्यांपैकी 51,313 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 15,157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 34.06 टक्के राहिली असून मुलांची 27.75 टक्के आहे. त्यामुळे मुलींनी पुन्हा एकदा निकालात बाजी मारली आहे. तसेच एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या 18,482 विद्यार्थ्यांना एटीकेटी योजनेद्वारे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विभागनिहाय निकालात नाशिक विभागाने 41.45 टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर नागपूर (39.42 टक्के), लातूर (34.55 टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर (34.27 टक्के) विभागांचा क्रमांक लागतो. तर कोकण विभागाचा निकाल केवळ 12.26 टक्के राहिला असून तो राज्यात सर्वात कमी आहे. मुंबई विभागाचाही निकाल 17.73 टक्के इतकाच लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 23.99 टक्के नोंदविण्यात आला. विद्यार्थ्यांना निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी 15 ते 24 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 400 रुपये आणि पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय 300 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मंडळाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील परीक्षांसाठी नव्या जोमाने तयारी करण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *