Headlines

मध्यरात्री ‘वर्षा’वर राजकीय खलबतं:जयंत पाटील, तटकरे आणि पटेल फडणवीसांच्या भेटीला; नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण




राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून, शरद पवार कोणती नवी राजकीय खेळी करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पक्षाची सर्व सूत्रे राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सध्या राज्याचे अर्थमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडेच आहे. मात्र, दुसरीकडे विकासकामांसाठी निधी आणि प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी शरद पवार गटाचे 10 पैकी किमान 9 आमदार सत्ताधाऱ्यांसोबत अर्थात महायुतीत (NDA) जाण्यास उत्सुक असल्याची अत्यंत महत्त्वाची पार्श्वभूमी या सर्व घडामोडींना आहे. ‘वर्षा’वर 1 तास 15 मिनिटे खलबतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरुवातीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच जयंत पाटील तिथे पोहोचले. या तिन्ही बड्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल 1 तास 15 मिनिटे (सव्वा तास) चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. सिल्व्हर ओक ते वर्षा विशेष म्हणजे, या गुप्त भेटीपूर्वी जयंत पाटील यांनी दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. तिथे चर्चा झाल्यानंतरच ते थेट वर्षा बंगल्यावर दाखल झाले. जयंत पाटील यांचा खुलासा या मध्यरात्रीच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रित बैठकीचा साफ इन्कार केला. ते म्हणाले, “माझा आणि प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या भेटीचा काहीही संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवल्याप्रकरणी मी केवळ 5 मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि बाहेर पडलो. तिथे तटकरे आणि पटेल आहेत याची मला कल्पना नव्हती.” सत्ताधारी गटात अंतर्गत खळबळ दुसरीकडे, पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीला पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस पाठवून आव्हान दिले आहे. खासदार पार्थ पवार यांचा संघटनात्मक बाबींमधील वाढता हस्तक्षेप या नाराजीमागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. सध्या शरद पवार गटाकडे विधानसभेत केवळ 10 आमदार आणि लोकसभेत 8 खासदार आहेत. मात्र, आगामी काळात मतदारसंघांची पुनर्रचना यांसारखी महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला संसदेत शरद पवारांच्या राजकीय वजनाची आणि संख्याबळाची गरज भासू शकते. जर शरद पवार यांचा गट NDA मध्ये सहभागी झाला, तर अर्थमंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव असलेले जयंत पाटील थेट राज्याचे नवे अर्थमंत्री होऊ शकतात. मात्र, हे पद आपल्याच पक्षाकडे राहावे यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गटही अत्यंत आग्रही आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी एकाच वेळी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट हा केवळ योगायोग मानला जात नाही. या सर्व नेत्यांनी आणि स्वतः शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी अद्याप मौन बाळगले असले तरी, जर हा गट खरोखरच NDA मध्ये सामील झाला, तर हा महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का ठरेल. यामुळे महाराष्ट्राची संपूर्ण राजकीय समीकरणे बदलून जातील, हे निश्चित.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *