Headlines

झाडगाव ग्रामपंचायतीत जादूटोणा सदृश प्रकार, पोलिसांत तक्रार:मुख्य गेटमध्ये षटकोनी आकृती, लिंबू-मिरचीची पूजा आढळली




भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील झाडगाव ग्रामपंचायतीच्या मुख्य आवारात सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने जादूटोणा सदृश प्रकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या मुख्य गेटच्या आत षटकोनी आकृती काढून लिंबू-मिरचीची पूजा करण्यात आली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आला, जेव्हा ग्रामपंचायतीचे शिपाई संजय लांजेवार कार्यालय उघडण्यासाठी आले. मुख्य गेट बाहेरून कुलूपबंद असतानाही, अज्ञात व्यक्तीने भिंत ओलांडून आत प्रवेश केला होता. जमिनीवर वर्तुळात कोळशाने षटकोनी आकृती काढण्यात आली होती. या आकृतीच्या मध्यभागी कापलेले लिंबू, मिरच्या, हळद-कुंकू, गुलाल आणि जळणाऱ्या अगरबत्त्या ठेवलेल्या होत्या. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हा अघोरी प्रकार समोर आला, त्याच दिवशी ग्रामपंचायतीत लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी शासकीय लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामुळे माता व पालकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले. झाडगावचे सरपंच भास्कर खंडाईत यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. हा केवळ अंधश्रद्धेचा भाग नसून, ग्रामपंचायतीला आणि गावाला वेठीस धरण्याचा खोडसाळ प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वीही ग्रामपंचायत परिसरात वृक्षांची तोडफोड, पाण्याच्या पाईपलाईन्स फोडणे आणि कचराकुंड्या चोरून फेकणे अशा घटना घडल्या आहेत. सरपंच खंडाईत यांनी या विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा अघोरी प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आला, याचा उलगडा पोलीस तपासातच होईल. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, अंधश्रद्धेच्या या खेळामुळे गावात तेढ निर्माण होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम आणि शांतता बाळगावी, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *