Headlines

शिवना केंद्रातील जि. प. शाळांची अवस्था दयनीय:विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, सर्व शाळांची मान्सूनपूर्व तपासणी होऊन महिना उलटूनही दुरुस्ती मोहीम नाही‎


.

संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला, नव्या उमेदीने मुले शाळेत पाऊल ठेवत आहेत. मात्र, सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रात शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. येथील शाळा उघड्या पडल्या असून तडकलेल्या भिंती आणि कुचंबणा सहन करणारे विद्यार्थी असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे तर दूरच, पण वर्गात सुरक्षित बसणेही जीवघेणे ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळा बकाल झाल्याने ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची प्रचंड आबाळ सुरू आहे. प्रशासनाचा पाठपुरावा नसणे आणि ग्रामपंचायतीची अनास्था यामुळे या जिल्हा परिषद शाळा आता शेवटच्या घटका मोजत आहेत. केंद्रातील सर्व शाळांची मान्सूनपूर्व तपासणी होऊन महिना उलटून गेला आहे. तपासणी होताच तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे यंदाही शाळांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होणार असल्याची भीती डॉ. सुभाषचंद्र काळे व महेश जोशी यांनी व्यक्त केली आहे.

शिवना केंद्रातील शाळेंच्या या आहेत मुख्य समस्या केंद्रातील शाळांच्या भिंती जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात छताची पत्रे गळतात. अनेक शाळांमधील स्वच्छतागृहे बंद आहेत. शिवना येथील मुख्य जिल्हा परिषद शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहाला दरवाजेच नसल्याने विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत आहे. काही ठिकाणी पाण्याचा अभाव असल्याने उग्र वास येत आहे. वाघेरा येथे १ ते ८ पर्यंतची शाळा असून वर्ग खोल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत. एका शाळेभोवती चक्क लाकडाचे ढीग लावण्यात आले असून ती शाळा बंद अवस्थेत आहे. वर्षभरापूर्वी लोकवर्गणीतून जागा घेतली, मात्र अद्याप बांधकाम प्रस्तावितच आहे. कोणत्याही शाळेला खेळायला मैदान नाही.

लवकरच दुरुस्ती मोहीम हाती घेणार Ãसर्व सरकारी शाळांची दुरुस्ती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने मान्सूनपूर्व शाळांची तपासणी मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सभेत या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली असून, लवकरच शाळा दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात येईल. -अनिता ज्ञानेश्वर मोठे, शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *