![]()
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजारपेठेत बुधवारी डाळिंब खरेदी-विक्री हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या नवीन डाळिंब हंगामाचे उद्घाटन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. पहिल्याच दिवशी बाजारपेठेत ५४६ क्रेट डाळिंबाची मोठी आवक झाली. लाडसांवगी येथील शेतकरी सुभाष पवार यांच्या डाळिंबाला प्रतिक्रेट सर्वाधिक ५ हजार १०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. अ समाधानकारक बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या उद्घाटन समारंभादरम्यान बाजार समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी आणि व्यापारी बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ, संचालक कैलास उकर्डे, दत्ताभाऊ उकर्डे, सुदाम ठोंबरे, सजनराव मते, पंचायत समितीचे सभापती कल्याण गायकवाड, रवी कुलकर्णी, अशोक पवार, भागचंद ठोंबरे, सजन बागल, रामकिसन भोसले, करमाडचे सरपंच गणेश मुळे, प्रवीण मुळे, शिवाजी वाघ, राजेंद्र काळे, गजानन काथार, अनिल अदाने, मनोज गायके आणि देविदास कीर्तिशाही आदींसह शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक सुदाम ठोंबरे यांनी केले. शुभारंभाच्या दिवशी सुभाष पवार यांच्या डाळिंबाला प्रतिक्रेट ५ हजार १०० रुपयांचा त्यापाठोपाठ जडगाव येथील सुरेश भोसले यांच्या डाळिंबाला ४ हजार ५००, तर रामेश्वर तारो यांच्या डाळिंबाला ३ हजार ५०० प्रतिक्रेट असा दर मिळाला. दरामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. करमाड बाजारपेठेत केवळ संभाजीनगर जिल्ह्यातीलच नव्हे, तर जालना , बीड जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर आपला माल विक्रीसाठी आणतात. यंदाच्या डाळिंब हंगामात बाजारपेठेत सुमारे दोन ते तीन लाख क्रेट डाळिंबाचा मोठा व्यवहार होईल, असा विश्वास बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. संभाजीनगर, जालना, बीडमधून होते आवक
Source link
दिव्य मराठी विशेष:लाडसावंगीच्या डाळिंबास 5,100 उच्चांकी दर, करमाडच्या उपबाजारपेठेत डाळिंब खरेदीस प्रारंभ, शेतकऱ्यांचा प्रतिसाद