![]()
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात भक्तिमय वातावरणात सुरू असलेली श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा बुधवारी १५ जुलै रोजी सायंकाळी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे दाखल झाली. पावसाच्या रिमझिम सरींमध्ये ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ आणि “श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या जयघोषात पालखीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात विसावली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही पालखी परिक्रमा गेल्या २८ वर्षांपासून अखंड सुरू आहे. यंदा परिक्रमेचे २९ वे वर्ष आहे. सोलापूरहून अक्कलकोटकडे येताना विजय बाग पालखी विसावा येथे हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. विजयव्हिला फार्म हाऊस येथे अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या उपस्थितीत विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे, तेजस्विनीराजे, हर्षवर्धनराजे, स्वामिनीराजे भोसले तसेच हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्ष अमय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, सत्यजीत जाधव, विश्वस्त तथा पालखी परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष भोसले यांच्यासह श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंदिर समितीचे सेवेकरी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते. यंदाच्या परिक्रमेत २४० दिवसांमध्ये १६ हजार किलोमीटरचा केला प्रवास यंदाच्या परिक्रमेत पालखीने सुमारे २४० दिवसांत १६ हजार किलोमीटरचा प्रवास केला. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, ५५ तालुके आणि सुमारे ५१ गावांमधून ही परिक्रमा पार पडली. कर्नाटकातील बेळगाव तसेच गोवा राज्यातील दोन जिल्ह्यांमध्येही पालखीचा मुक्काम झाला. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन्मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो श्री स्वामी समर्थांच्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
Source link
धार्मिक:‘अवधूत चिंतन'च्या जयघोषात श्री स्वामींच्या पादुका पालखीचे अक्कलकोटमध्ये आगमन