Headlines

एक्सक्लुझिव्ह‎:पंढरपुरात यंदा दर्शन रांगेसाठी पाच शेड वाढवल्याने आषाढीला 9 तासात दर्शन




आषाढी यात्रेच्या काळात येणाऱ्या जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांना सुलभ आणि सुखद, कमी वेळात दर्शन मिळावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विशेष नियोजन केलेले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन २० वॉटर प्रूफ दर्शन शेड, तसेच दर्शन रांगेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना शेळके म्हणाले की, यंदाची आषाढी एकादशी २५ जुलै रोजी संपन्न होत आहे. यात्रेसाठी १५ ते १८ लाख भाविक येतील अशी अपेक्षा आहे. तसेच जुलै अखेरीस यात्रेचा कालावधी असल्याने पावसाची शक्यता लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनाचे नियोजन केलेले आहे. आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना जलद, सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. दर्शनरांगेसाठी दरवर्षी १२ ते १५ शेड असतात; मात्र यंदा समितीने खाजगी जागा भाड्याने घेऊन त्यावर वॉटर प्रूफ शेड उभे केले आहेत. त्यामुळे यंदा एकूण २० दर्शन शेड रांगेसाठी उपलब्ध असणार आहेत. दर्शन रांगेला बॅरिकेटिंग व संरक्षक जाळी बसवून घुसखोरीला पूर्णपणे आळा घालण्यात आलेला आहे. व्हीआयपी दर्शन व टोकन दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली असून, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा देखील बंद करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतील रहदारी सुरळीत राहण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. तसेच अनुभवी पर्यवेक्षक, कमांडोज व माजी सैनिकांची सुरक्षा व्यवस्थेत नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी, मंदिराचे व्हीआयपी प्रवेशद्वार बंद ठेवणे, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, लाईव्ह दर्शन व्यवस्था, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *