Headlines

बांधिलकी:विद्यार्थिनींना शिक्षणाचे बळ; रोटरी क्लबतर्फे 40 सायकलींचे वाटप




ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाशी जोडण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अकोला सरसावला आहे. सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील गायगाव येथील श्री समर्थ विद्यालयातील आठवी, नववी आणि दहावीच्या गरजू ४० विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. शाळेपासून घराचे अंतर जास्त असल्यामुळे पायपीट करणाऱ्या मुलींसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने आधार ठरला आहे. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ अकोलाचे अध्यक्ष ॲड. गिरीश धाबलिया होते. यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. वाहतुकीच्या साधनांच्या अभावामुळे किंवा थकव्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. ही पायपीट थांबावी आणि त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करावे, हाच या सायकल वाटपाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागते. अनेकदा बसची वेळ जुळत नाही किंवा पाय चालत जावे लागते. यामुळे विद्यार्थिनींचे शारीरिक हाल होतात आणि वेळही वाया जातो. रोटरी क्लबने या समस्येची दखल घेत विद्यार्थिनींची निवड केली. ४० विद्यार्थिनींना जेव्हा सायकलींचे वाटप करण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद दिसून आला. यामुळे केवळ त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार नाही, तर त्या वेळेचा वापर त्या अभ्यासासाठी करू शकणार आहेत. रोटरी क्लब ऑफ अकोला गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मात्र, हा सायकल वाटप उपक्रम विद्यार्थिनींच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. श्री समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी रोटरी क्लबचे आभार मानताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. समाजात आजही दातृत्व जिवंत असून, रोटरी सारख्या संघटनांमुळे गरीब आणि होतकरू मुलांना मदतीचा हात मिळत आहे. सायकल नव्हे प्रगतीचे चाक विद्यार्थिनींनी सांगितले की, शाळेत येण्यासाठी रोज चालावे लागायचे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात खूप त्रास व्हायचा. आता वेळेत शाळेत पोहोचू शकू आणि अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ शकू. केवळ सायकल दिली नाही, तर प्रगतीचे चाक फिरवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *