Headlines

दिलासा:संत नरसिंग महाराज मंदिर परिसरातील दुरुस्तीला सुरुवात, साचणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या समस्येतून भाविक, नागरिक अन् व्यापाऱ्यांना मिळणार मुक्ती




शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री संत नरसिंग महाराज मंदिर परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे भाविक, नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांना दरवर्षी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारे वृत्त “दिव्य मराठी’त ५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली असून, मंदिर परिसरातील रस्ता व जलनिस्सारण व्यवस्थेच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात मंदिर परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने भाविकांना दर्शनासाठी येताना कशी मोठी कसरत करावी लागत आहे, याचे वास्तव मांडण्यात आले होते. तसेच पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि अपघातांचा धोका वाढल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या वृत्ताची दखल घेत अकोट नगरपरिषदेमार्फत परिसरातील खराब झालेले पेव्हर ब्लॉक काढून रस्त्याची दुरुस्ती करणे, पृष्ठभाग समतल करणे तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने हे काम वेगाने सुरू असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुरू असलेले काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून भविष्यात पुन्हा पाणी साचणार नाही, यासाठी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील या दुरुस्तीच्या कामामुळे भाविक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने उर्वरित कामही तत्परतेने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नरसिंग महाराजांच्या पटांगणात ज्या ठिकाणी पाणी साचत होते, त्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ कामकाज मार्गी लावण्याची सूचना नगराध्यक्ष माया धुळे व पाणीपुरवठा सभापती अमोल पालेकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे कामाला गती आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *