![]()
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून, पुढील दोन-तीन दिवसांत अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने नांदेड, लातूर, धाराशिव, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला बळ सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बिहार, गुजरात तसेच अरबी समुद्रापासून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामान प्रणालीमुळे मान्सूनला पुन्हा बळ मिळत असून, २० जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला काही भागांत चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पुन्हा खंड पडल्याने खरीप पिकांवर ताण वाढला आहे. अनेक भागांतील धान, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांना पाण्याची नितांत गरज असून, पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात अजूनही पावसाची तूट १६ जुलैपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ११ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत अजूनही पावसाची मोठी तूट आहे. काही विभागांत २० ते ६० टक्क्यांपर्यंत पावसाची कमतरता नोंदवली गेली असून, धरणे आणि लहान जलस्रोतही अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. एल निनोचा परिणाम कायम हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग आणि स्वरूप बदलले आहे. कोकण किनारपट्टीवर भरपूर पाऊस पडत असला तरी सह्याद्री ओलांडल्यानंतर बाष्पयुक्त वारे कमकुवत होत असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे यंदा पावसाचा कालावधी आणि वितरण दोन्ही असमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस महत्त्वाचे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत विजांसह पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यानंतर २० जुलैपासून मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असले तरी दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. हेही वाचा.. JK मध्ये 15 दिवसांत 16 ढगफुटी:बंगालच्या उपसागरात नवी प्रणाली सक्रिय झाल्याने यूपी-बिहारमध्ये पाऊस, तामिळनाडूत हीटवेव्ह जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाल्यापासून, जम्मू-काश्मीरमध्ये अवघ्या १५ दिवसांत ढगफुटीच्या १६ घटना घडल्या आहेत. काश्मीर हवामान केंद्राच्या मते, आगामी काळात अशा घटनांची वारंवारता वाढू शकते. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सविस्तर वाचा
Source link
अखेर पावसाची प्रतीक्षा संपणार?:राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट; 20 जुलैनंतर मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता