Headlines

'जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत':राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित




राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सतेज पाटील यांचा दावा- ‘जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत’ काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जयंत पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराच्या वृत्तावर स्पष्ट शब्दांत अविश्वास दर्शवला. “जयंत पाटील हे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारे खंबीर नेतृत्व आहे. ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा चालवतात. त्यामुळे ते महायुतीसोबत उजव्या वळणावर जाण्याचा निर्णय घेतील, असे मला अजिबात वाटत नाही,” असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. “सध्याचा काळ कठीण असला तरी, तो निघून जाणार आहे. 2029च्या निवडणुकांमध्ये राज्याच्या राजकारणात नक्की बदल होईल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्व ताकतीने एकत्र राहू आणि जयंत पाटीलही आमच्यासोबतच राहतील,” असे ते म्हणाले. सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात: राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीच्या दाव्यावर त्यांनी शंका घेतली. “जर अटी लावायच्या असतील, तर त्याला सरसकट कसे म्हणता येईल? सरकारच्या घोषणा आणि अंमलबजावणीत मोठी ‘मिसिंग लिंक’ आहे. वीज बिल सवलतीच्या नावाखाली वीज कंपन्यांकडे भ्रष्टाचाराचा पैसा जाऊ नये, ही आमची मागणी आहे.” शक्तिपीठ हा पूर्णपणे ‘गरज नसलेला’ महामार्ग असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला. “मुख्यमंत्री आषाढी वारीला विठ्ठलाला साकडं घालतात, पण या महामार्गातून शेतकऱ्यांचे कसे भलं होणार, हे त्यांनी सांगावे. आम्ही विठ्ठलाकडे हेच साकडं घालतो की या सरकारला शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्याची सुबुद्धी मिळो.” सुनील तटकरेंचेही सूचक विधान- ‘पवार साहेबांना कोणासोबत जायचे हे ठरवण्याचा अधिकार’ दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या संपूर्ण राजकीय समीकरणावर भाष्य केले. जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे राजकीय समीकरण असेल असे आपल्याला वाटत नसल्याचे तटकरे म्हणाले. “जयंतराव हे मुरब्बी राजकारणी आहेत, ते सातवेळा आमदार राहिलेत आणि त्यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. ते मुख्यमंत्र्यांना वेगळ्या प्रशासकीय कामासाठीही भेटू शकतात, यात काही वावगे नाही.” शरद पवारांचा अधिकार शरद पवारांचा एनडीएमध्ये संभाव्य प्रवेशावर बोलताना तटकरे म्हणाले, “शरद पवार हे गेली 6 दशके राज्य आणि देशाच्या राजकारणाचा प्रमुख घटक राहिले आहेत. त्यांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा आणि सत्तेसाठी कोणासोबत जायचे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे.” शिंदेंचा अर्थखात्याला विरोध नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्थखाते राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून अमित शहा यांची भेट घेत असल्याच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद उत्तमरीत्या भूषवले आहे. ते दुसऱ्या पक्षाला विशिष्ट खाते देऊ नका असे म्हणतील, असे मला वाटत नाही. मित्रपक्षांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत.” सुनील तटकरे यांनी अर्थखात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. “अर्थखाते राष्ट्रवादीलाच मिळावे ही आमची आग्रही मागणी आहे. याच आणि इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.” संबंधित बातमी वाचा… ‘वर्षा’ बंगल्यावर जयंत पाटलांना भेटलो नाही:राष्ट्रवादीला अर्थखातं हवं; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार- सुनील तटकरे जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथे गेले होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा करतो, रवी राणा मोठे नेते आहेत मी छोटा माणूस आहे त्याच्यावर बोलू शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *