Headlines

अकोल्यातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा:15 हजारांसाठी स्टोन क्रशर चालकांना धमकावल्याचा आरोप




अकोला जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात आज एकच खळबळ उडाली. स्टोन क्रशर उद्योजकांकडे खंडणी मागितल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी नऊ दिवसांच्या प्राथमिक चौकशीनंतर ही कारवाई केली असून, गुन्हा दाखल होताच राज्य शासनाने गायकवाड यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. स्टोन क्रशर उद्योजक विवेक प्रभाकर बिजवे (वय ६२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, बिजवे यांचा बार्शी टाकळी परिसरात खडी मशिनचा व्यवसाय आहे. १९ मार्च २०२६ रोजी आरोपी प्रमोद गायकवाड यांनी बिजवे यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. केवळ बिजवेच नव्हे, तर इतर सदस्यांकडूनही प्रत्येकी १५ हजार रुपये मागितल्याचा आरोप आहे. “जर पैसे दिले नाहीत, तर तुमचे स्टोन क्रशर आणि व्यवसाय बंद पाडिन,” अशी धमकी गायकवाड यांनी दिली होती. या भीतीपोटी तक्रारदाराने त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन १५ हजार रुपये दिले. १ एप्रिल २०२६ रोजी गायकवाड यांनी पुन्हा फोन करून “तुम्हाला पाहून घेतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुराव्यासाठी ‘ऑडिओ क्लिप’ सादर या संपूर्ण वादात एक कथित ऑडिओ क्लिप पुराव्या म्हणून पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. या क्लिपमधील संवादाची खातरजमा आणि नऊ दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (२), ३५१ (१) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PCA) कलम ७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच प्रशासकीय यंत्रणा हलली असून गायकवाड यांना पदावरून हटवून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता सरकार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गायकवाड यांचा दावा : ‘रॉयल्टी वसुलीचा दबाव’ दरम्यान, प्रमोद गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण केवळ रॉयल्टी वसुलीसाठी दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. अकोला येथील खाण आणि क्रशर उद्योग संघटनेच्या कोणत्याही व्यक्तीकडे मी कधीही पैसे मागितले नाही. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून माझ्यावरील आरोप निखालस खोटे आहेत, असे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *