Headlines

गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा:अन्यथा 50 हजार शेतकऱ्यांसह आंदोलन'; विजय वडेट्टीवारांचा इशारा




गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा 50 हजार शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. कालव्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवरही संताप व्यक्त केला. वडेट्टीवार म्हणाले की, गोसेखुर्द प्रकल्प हा चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा देणारा महत्त्वाचा प्रकल्प असून शेतकऱ्यांसाठी तो वरदान ठरणार आहे. 2007-08 मध्ये प्रकल्प रखडला होता. त्यावेळी राज्यात मंत्री असताना तत्कालीन केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये निधी देत प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यात आला. त्यांनी सांगितले की, कालव्यातील ‘क्रिटिकल पॅच’मुळे वारंवार अडचणी निर्माण होत होत्या. पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात पाणी सोडताना कालव्याचा भाग कोसळण्याचा धोका असल्याने सुमारे 240 ते 250 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. मात्र, हे काम घेणाऱ्या ठेकेदाराने अपेक्षित गतीने काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. ‘केवळ 15 टक्के काम; शेतकरी दोन वर्षांपासून वंचित’ वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार, या कामाची मुदत ऑक्टोबर 2026 मध्ये संपत आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. या संथ गतीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी उन्हाळी पिकासाठी आवश्यक पाण्यापासून वंचित राहिले आहेत. अनेकदा मोर्चे, आंदोलने झाली, शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कार्यालयात घुसूनही संताप व्यक्त केला, तरी कामाला गती मिळालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ‘ठेकेदार कोणाचाही असो, काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे’ “ठेकेदाराचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे, तो आमदाराचा भागीदार आहे की नाही, याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. ठेकेदारी घेतली आहे तर काम मुदतीत पूर्ण झालेच पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत वडेट्टीवार म्हणाले. 50 हजार शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण झाले नाही, तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. “काम वेळेत पूर्ण झाले नाही तर ५० हजार शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू. गरज पडल्यास सद्याचे काम रद्द करून सक्षम ठेकेदाराकडून ते पूर्ण करून घ्यावे,” अशी मागणी त्यांनी केली. पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा यंदा पाऊस उशिरा झाल्याने धान पिकावर संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघासाठी गोसेखुर्दचे पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून कालव्यातून शेतीसाठी पाणी घेण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *