![]()
मागील काही महिन्यांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत मुंडे यांचा बदललेला आणि अधिक तंदुरुस्त दिसणारा लूकही लक्ष वेधून घेत आहे. धनंजय मुंडे यांनी पोस्टसोबत लिहिलेल्या कवितेत संघर्ष, टीका, अडचणी आणि त्यातून पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…’ अशा आशयाच्या या ओळींमुळे त्यांच्या पोस्टचा राजकीय अर्थ काढला जात आहे. जिममधील व्यायामाचा व्हिडिओ, बदललेला लूक धनंजय मुंडे मागील काही काळापासून आरोग्यावर विशेष लक्ष देत असल्याचे त्यांनी यापूर्वीही सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी जिम सुरू केल्याचा उल्लेख केला होता. आता त्यांनी प्रत्यक्ष जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंडे व्यायाम करताना दिसत असून, त्यांच्या शरीरयष्टीतही बदल झाल्याचे जाणवत आहे. राजकीय घडामोडींपासून काहीसे अंतर ठेवून सध्या ते स्वतःच्या आरोग्याला आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देत असल्याचे त्यांच्या या पोस्टवरून दिसून येते. मात्र, केवळ आरोग्यविषयक पोस्ट न करता त्यांनी त्यासोबत संघर्षाचे भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्याने या पोस्टला राजकीय संदर्भ जोडला जात आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत…’ मुंडे यांच्या पोस्टमधील सर्वाधिक चर्चेत आलेली ओळ म्हणजे ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…’. त्यानंतर ‘भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे’ आणि ‘निंदा-दूषणे आता न भिडती’ अशा ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. गेल्या काही काळात धनंजय मुंडे यांना राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे भाष्य स्वतःच्या संघर्षाशी जोडले जात आहे. विरोधकांकडून झालेली टीका, आरोप आणि राजकीय अडथळे यानंतरही आपण खचलेलो नाही, तर पुन्हा उभे राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असा संदेश या पोस्टमधून दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय अडचणी वाढल्या धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रवासात बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मोठा बदल झाला. 2024 मधील विधानसभा निवडणुकीनंतर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडचे नाव चर्चेत आले. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीडच्या राजकारणात प्रभाव असलेल्या धनंजय मुंडे यांना काही काळ राजकीयदृष्ट्या बॅकफुटवर जावे लागले. त्यांच्याकडील पालकमंत्रिपदाची जबाबदारीही गेली. त्यानंतर मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार का, त्यांच्या राजकीय पुनरागमनाची दिशा काय असेल, याबाबत सातत्याने चर्चा होत राहिली. मात्र, मंत्रिपदाच्या पुनरागमनाबाबत अद्याप अधिकृत निर्णय किंवा स्पष्ट घोषणा झालेली नाही. राजकीय पुनरागमनाचे संकेत? दरम्यान, काही काळ शांत राहिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. एका जाहीर सभेतील त्यांच्या भाषणामुळेही त्यांच्या राजकीय पुनरागमनाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देत असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर बीडच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याच्या त्यांच्या हालचालींकडे लक्ष लागले आहे. अलीकडे पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संबंधित एका प्रसंगात केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंडे यांना जाहीरपणे सूचना केल्याचे समोर आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मुंडे यांचा जिममधील नवा व्हिडीओ आणि त्यासोबतची कविता केवळ आरोग्यविषयक पोस्ट आहे की त्यातून आगामी राजकीय वाटचालीचा संदेश दिला आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ‘स्वतःशी सुद्धा लढतो आहे…’ या वाक्याने लक्ष वेधले मुंडे यांच्या पोस्टमधील ‘हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…’ ही ओळही विशेष चर्चेत आहे. राजकारणातील आव्हानांबरोबरच वैयक्तिक अडचणींचा सामना करत असल्याचा हा अप्रत्यक्ष संदेश असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून मानले जात आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या टीकेचा सामना करून पुन्हा राजकीय मैदानात उतरण्याची मानसिक तयारी मुंडे करत असल्याचे संकेत या पोस्टमधून मिळत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. हेही वाचा… LIVE मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10 वा दिवस: पाणी अन् उपचार नाकारल्याने प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीलाही दिला नकार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. गेली 2 दिवस त्यांनी उपचार आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावत असतानाही जरांगे पाटील यांनी पाणी, सलाइन तसेच वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाकडून अद्याप संपर्क करण्यात न आल्याने जरांगे समर्थक संतप्त झाले आहेत.त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ पाऊणतास रास्ता रोको आंदोलन केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
धनंजय मुंडेंचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ चर्चेत:‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…’, राजकीय पुनरागमनाचे संकेत!