![]()
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी चांदूरबाजार येथील भाजपा कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी समस्या मांडल्या. दरम्यान नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेत आमदार तायडे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. नागरिकांना अडचणी लोकप्रतिनिधींसमोर मांडता याव्यात आणि प्रशासकीय स्तरावर प्रलंबित कामांना गती मिळावी, या उद्देशाने या जनता दरबाराचे आयोजन केले होते. या वेळी विविध विभागांशी संबंधित अनेक तक्रारी व प्रश्न नागरिकांनी मांडले. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांच्या समस्या वेळेत सुटाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार तायडे यांनी केले. जनता दरबारात शेतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न, घरकुल योजनेतील अडचणी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठता यादीतून वगळण्यात आलेली नावे, रब्बी हंगामातील पीक नियोजन, वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान सध्या राज्यभर निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार तायडे यांनी गावोगावच्या शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासोबतच त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनता दरबारामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकोडे, तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे, शिरजगाव मंडळ अध्यक्ष हर्षल धुळे, आमदारांचे पीए अंकुश शिर्लोस्कर, प्रतीक भुसारी यांच्यासोबतच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महावितरणबद्दलही तक्रारी शिराळा वीज वितरण उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या वडूरा येथील शेतकऱ्यांनीही जनता दरबारात आपली कैफियत मांडली. गावातील कोंडे डीपी आणि काकडे डीपीवर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची माहिती शेतकरी सत्यजित ठाकरे यांनी दिली. याची दखल घेत आमदार प्रवीण तायडे यांनी शिराळा उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता कोकाटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
Source link
विद्यार्थ्यांसह नागरिक, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यवाही करा- आमदार तायडे:जनता दरबारातून जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या, विविध विषयांवर चर्चा