Headlines

पर्यावरणपूरक कापडी आकाश दिव्यांना पसंती; दरात 20% वाढ:दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली, खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी




गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसऱ्याची धामधूम संपल्यानंतर सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीचा सण चार दिवसांवर आल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. रंगीबेरंगी आकाशकंदिलांच्या लखलखत्या रोषणाईने बाजारपेठ उजळून निघाली असून, आकर्षक डिझाइनचे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा कापडी, ज्यूटपासून तयार केलेल्या आकाशदिव्यांना ग्राहकांची अधिक मागणी असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले आहे.शहरातील गाडगेनगर, शेगाव नाका, चित्रा चौक परिसर, इतवारा बाजार, अंबादेवी मार्ग, गांधी चौक, राजापेठ यासह विविध भागांतील रस्त्यांवर तसेच दुकानांमध्ये आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा एक फुटापासून पाच फुटांपर्यंतचे विविध आकारांतील कंदील बाजारात उपलब्ध आहेत. कागदी, कापडी, वेलवेट, फोल्डेबल चिनी कंदिलांची ग्राहकांकडून खरेदी सुरू आहे. मात्र ज्यूट आणि कापडाच्या आकाशदिव्यांना ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. सजावटीसाठी रंगीबेरंगी मणी, काचेचे तुकडे, आकर्षक सजावटीचे साहित्य वापरून नक्षीदार कंदील तयार केले आहेत. काही कंदिलांवर लक्ष्मीची छायाचित्रेही लावली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आकाशकंदिलांच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आकाश कंदील विक्रेते सागर लोंधे यांनी दिली. घराच्या प्रवेशद्वारावर आणि दुकानांवर सजावटीसाठी लहान कंदिलांच्या तोरणांनाही मागणी आहे. आकाशकंदिलांसोबतच घरांच्या सजावटीसाठी विविध रंगांच्या विद्युत रोषणाईच्या माळाही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजारात ६० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील उपलब्ध आहेत. वेलवेट कंदील ३०० ते ७०० रुपये, कागदी कंदील ३०० ते ८०० रुपये, कापडी कंदील २०० ते एक हजार रुपये, तर मोठ्या आकाराचे कंदील ७०० ते १,५०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. फोल्डेबल चिनी कंदिलांची किंमत २०० ते ३०० रुपये आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *