![]()
ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने मराठी भाषेबाबत केलेल्या एका विधानावरून आता राज्याच्या राजकारणात मोठा वाद पेटला आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांच्यावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सडकून टीका केली आहे. “संजय दत्तला मराठी येत नसल्याचे सांगताना तुम्ही हसता आणि दुसरीकडे सर्वसामान्य रिक्षाचालकांना मात्र मराठीच्या मुद्द्यावरून दमदाटी करता, हा तुमचा कोणता न्याय आहे?” असा थेट सवाल मेहता यांनी विचारल्यामुळे महायुतीमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नेमका प्रकार काय घडला? ठाण्यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या दहीहंडी (2026) सोहळ्याला अभिनेता संजय दत्त याने हजेरी लावली होती. यावेळी मंचावरून बोलताना संजय दत्त म्हणाला की, “मी 6 वर्षे पुण्याच्या येरवडा कारागृहात होतो, तरीही मला मराठी शिकता आले नाही.” राज्याच्या भाषेबाबत एका अभिनेत्याने असे विधान केल्यानंतर तिथेच शेजारी उभे असलेले मंत्री प्रताप सरनाईक हे त्याला विरोध करण्याऐवजी हसताना दिसले. याच कृतीवर आता भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. कथनी आणि करणीत फरक असलेले डमी मंत्री आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्या दुटप्पी भूमिकेवर थेट निशाणा साधला आहे. मेहता यांनी याच मुद्द्यांवरून सरनाईकांना घेरले, “एका बड्या कलाकाराने मराठी येत नसल्याचे जाहीरपणे मंचावर सांगणे आणि त्यावर राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी हसून दाद देणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. परिवहन मंत्री म्हणून तुम्ही सर्वसामान्य गरीब रिक्षाचालकांना आणि वाहनचालकांना मराठी सक्तीच्या नावाखाली दमदाटी करता, त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारता. मग तोच न्याय कलाकारांना का लावला जात नाही? मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना मेहता म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी यांना कधीच कोणते काम करू दिले नाही. केवळ मंत्रिमंडळात काही ‘डमी मंत्री’ लागतात, म्हणूनच प्रताप सरनाईक यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये मोठा फरक आहे.” महायुतीमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय वाद जुनाच आहे. मिरा-भाईंदरच्या राजकारणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी उडत असतात. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतही या दोघांमधील जुगलबंदी पाहायला मिळाली होती. कालच सरनाईक यांनी मिरा-भाईंदरमध्ये नाव न घेता मेहतांवर टीका केली होती, त्याला मेहता यांनी थेट संजय दत्तच्या मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिले आहे. मराठी भाषेचा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच संवेदनशील राहिला आहे. मात्र, आता याच मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या आमदारांमध्ये जाहीर संघर्ष सुरू झाल्याने, आगामी काळात महायुतीमध्ये यावरून मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा… धनंजय मुंडेंचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ चर्चेत:‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…’, राजकीय पुनरागमनाचे संकेत! मागील काही महिन्यांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यासोबत लिहिलेल्या कवितेच्या ओळींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओत मुंडे यांचा बदललेला आणि अधिक तंदुरुस्त दिसणारा लूकही लक्ष वेधून घेत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
संजय दत्तला हसून दाद, अन् रिक्षाचालकांना दमदाटी?:भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर घणाघात, मराठीच्या मुद्द्यावरून डिवचलं