![]()
वाकड आणि पुनावळे येथील ‘स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी’चा 20 वा वर्धापन दिन तसेच ‘गीत फुलोरा’ काव्य गायन उपक्रमाच्या 22 व्या वर्षानिमित्त एलप्रो ऑडिटोरियम येथे भव्य वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या खास प्रसंगी अकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी यांनी रचलेल्या “कागदाची होडी” या बालगीताचे लोकार्पण बालभारती कलाशिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजयकुमार लोळगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ‘गीत फुलोरा’ यूट्यूब चॅनेलवर गाणे उपलब्ध ‘दिली बाबांनी मला कागदाची होडी, चाले डौलाने कशी पाण्यातली मासोळी’ हे प्रत्येकाला बालपणीच्या आठवणीत घेऊन जाणारे बालगीत अथर्व कुलकर्णी व भाग्यदा कुलकर्णी यांनी गायले असून, अभय आणि अर्पिता कुलकर्णी (अभयार्पिता) यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. हे गीत ‘गीत फुलोरा’ (Geetfulora) या यूट्यूब चॅनेलवर रसिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 10 तासांचे अखंड संगीतमय सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वय वर्ष साडेतीनपासूनच्या तब्बल 100 विद्यार्थ्यांनी सलग 10 तास संगीतमय सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. ‘जय जगदीश हरे’ आणि सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी राग भूप, भीमपलास, बागेश्री, काफी, देस, दुर्गा, खमाज यांसारख्या विविध रागांचे गायन तसेच तबला, हार्मोनियम, कीबोर्ड आणि गिटार वादन सादर केले. अथर्व कुलकर्णी यांनी राग मधुवंतीमधील बडा ख्याल आणि ‘आवडे पंढरी’ हे भक्तिगीत सादर करून दाद मिळवली. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन, सूत्रसंचालन आणि वेशभूषा विद्यार्थ्यांनीच सांभाळत व्यासपीठावरील सादरीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मान्यवरांचे उद्गार व कौतुक: डॉ. अजयकुमार लोळगे: “’कागदाची होडी’ हे गीत प्रत्येकाच्या बालपणाला उजाळा देणारे आहे. बालभारती ‘गीत फुलोरा’ उपक्रमाची नक्कीच दखल घेईल.” पं. बाळासाहेब सूर्यवंशी: “स्वरोपासना आणि गीत फुलोरा म्हणजे संगीतमय संस्कार केंद्रच आहे.” पं. सुधाकर चव्हाण: “शंभर विद्यार्थ्यांनी सूर-तालात गायन करणे कौतुकास्पद असून, त्यांनी नियमित रियाजाचे महत्त्व अधोरेखित केले.” या सोहळ्याला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे सचिव पं. सुधाकरजी चव्हाण, सुश्री क्षमा गोडसे, सुश्री संध्याताई केळकर, सुरभी ब्युटी अकॅडमीच्या संचालिका सुश्री श्रुती मनवेलीकर, तसेच संचालक अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी आणि अथर्व कुलकर्णी उपस्थित होते. अकॅडमीच्या संचालिका अर्पिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, श्रद्धा पाटील यांनी औपचारिक सूत्रसंचालन केले तर अथर्व कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘वंदे मातरम’ने या भव्य संगीतमय सोहळ्याची सांगता झाली.
Source link
‘स्वरोपासना’चा 20 वा वर्धापन दिन:"कागदाची होडी" बालगीताचे दिमाखात लोकार्पण; पुण्यात 100 विद्यार्थ्यांनी सलग 10 तास गाजवला मंच