Headlines

दशकाच्या अंधाराला लागला अखेर पूर्णविराम:अंजनगाव सुर्जीतील 8 दिवे पुन्हा प्रकाशमान, युद्धपातळीवर दुरुस्ती‎




शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेले तब्बल आठ हायमास्ट दिवे गेल्या दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने शहरात अक्षरशः अंधाराचे सावट पसरले होते. विशेषतः सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुख्य रस्ते, चौक आणि वर्दळीच्या भागांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या समस्येची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष अविनाश गायगोले आणि मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पाठपुरावा केल्याने दहा वर्षांपासून बंद असलेले सर्व हायमास्ट दिवे अखेर पुन्हा प्रकाशमान झाले आहेत. नगरपरिषदेकडून उपलब्ध माहितीनुसार, नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेल्या शासन नियुक्त बी.ए.सी. इन्फ्राटेक प्रा. लि. आणि विन्सी ग्लोबल प्रा. लि. (जे.व्ही.), हैदराबाद या कंपन्यांना अधिकृत पत्राद्वारे तात्काळ दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले. नगरपरिषद आणि संबंधित कंपन्यांमध्ये २५ मार्च २०२६ रोजी झालेल्या करारानुसार ही नोटीस बजावण्यात आली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आणि मुख्याधिकारी लोहकरे यांनी संबंधित कंत्राटदार कंपनीला विलंब न करता दुरुस्तीचे आदेश दिले. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेनंतर कंपनीने युद्धपातळीवर काम सुरू करत अवघ्या एका दिवसात शहरातील सर्व आठ हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती पूर्ण करून ते सुरू केले. हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती ही अत्यंत उंचीवरील आणि तांत्रिक स्वरूपाची असल्याने कंपनीकडून विशेष हायड्रॉलिक लिफ्टची व्यवस्था करण्यात आली. तांत्रिक पथकाने दिवसभर परिश्रम घेत प्रत्येक ठिकाणची दुरुस्ती पूर्ण केली आणि शहरातील प्रमुख चौक पुन्हा उजळून निघाले. या संपूर्ण मोहिमेत नगरपरिषदेच्या विद्युत अभियंता सुप्रिया रिठे यांच्यासह शुभम बोरोडे, अमान आणि इम्रान खान यांनी विशेष परिश्रम घेत दुरुस्तीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. दहा वर्षांपासून बंद पडलेले हायमास्ट दिवे पुन्हा सुरू झाल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाले असून, नागरिकांमध्ये समाधान आहे. मुलभूत सुविधांसाठी दाखवली तत्परता नगराध्यक्ष अविनाश गायगोले, मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि नगरपरिषद प्रशासनाच्या तत्पर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, शहरातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुकही होत आहे. कारण, मागील १० वर्षांपासून या सुविधा असूनही ती बंद असल्याने होणाऱ्या असुविधेकडे कोणाचेही लक्ष नव्हते. परंतु, यावेळी प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *