![]()
पुण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास कक्षातून अटक केलेला एक आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैभव अनिल खोत (वय १९, रा. श्रमिकनगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. खोत याला एका गुन्ह्यात १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याला तपास पथकाच्या कक्षात बेडी घालून ठेवण्यात आले होते. पहाटे चारच्या सुमारास खोत याने बेडीतून हात अलगदपणे काढून घेतला. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून तो पसार झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी शहाजी ठवाळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण पुढील तपास करत आहेत. टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात शंकरशेठ रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिबाईल झुल्ला खान (वय ४०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. जिबाईल याचे मेहुणे इरफान खान भुलन खान (वय ४३, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. क्वार्टरगेट चौक) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिबाईल आणि इरफान हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून, मजुरी करतात. १८ जुलै रोजी दुचाकीस्वार इरफान आणि जिबाईल हे शंकरशेठ रस्त्यावरुन जात असताना, शंकरशेठ रस्ता परिसरातील सेव्हन लव्हज चौक (चिमणराव ढोले पाटील चौक) येथे भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जिबाईल हा टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार इरफानही जखमी झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या जिबाईलला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक अमोल वळसंग या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी पसार:19 वर्षीय वैभव खोत बेडीतून हात काढून फरार