![]()
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी सकाळी ९:३० ते १२:१५ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूड येथील गांधीभवन येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. सप्तर्षी यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून डॉ. सप्तर्षी यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी उर्मिला सप्तर्षी, मुलगा कबीर उमाकुमार, भाऊ डॉ. प्रवीण सप्तर्षी, मानसपुत्री नंदा पाटील तसेच इतर नातेवाईक उपस्थित होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी माहिती दिली की, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवनचे विश्वस्त तुषार गांधी यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासोबतचे आपले बालपणापासूनचे संबंध सांगितले. ते म्हणाले, “काही लोकांचे आयुष्य केवळ वयावर अवलंबून नसते, तर ते अनेक लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतात. डॉ. सप्तर्षी यांनीही अनेकांच्या जीवनात बदल घडवला. कुटुंबाला मागे ठेवून समाजासाठी काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. त्यांना अजून खूप काही करायचे होते. त्यांचे अचानक निघून जाणे धक्कादायक असले तरी, ते अखेरपर्यंत काम करत राहिले.” डॉ. प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, त्यांचे बंधू सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर होते. ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. ते पुढे म्हणाले की, एक वृक्ष लावून आम्ही त्यांच्या अस्थींचे विसर्जन करणार आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “जिद्द, सचोटी आणि जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न युवक क्रांती दलाच्या माध्यमातून डॉ. सप्तर्षी यांनी केला. पुरोगामी विचार जपणे आणि गांधी विचार समाजात रुजविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले, ज्यामुळे अनेक कार्यकर्ते घडले. त्यांचे विचार आजही आवश्यक आहेत. त्यांच्या निधनाने एक तारा निखळला आहे. अनेकांना जीवनाच्या योग्य वाटा दाखवून त्यांनी प्रेरणा दिली. त्यांचे असणे ऊर्जा देणारे होते, त्यामुळे आता कोणाकडे पाहून वाटचाल करावी, असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.” ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) आणि सामाजिक योगदान डॉ. सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज परिवर्तनासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी समर्पित केले होते. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. युवकांमध्ये सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या अत्यंत प्रभावी संघटनेची स्थापना केली. चौफेर संघर्ष डॉ. सप्तर्षी केवळ एक आक्रमक आंदोलक नव्हते, तर एक संवेदनशील लेखक आणि अभ्यासू वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. समाजातील विषमता, वाढता भ्रष्टाचार, शैक्षणिक सुधारणा, ग्रामीण विकास आणि लोकशाही हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना वैचारिक दिशा मिळाली. जनता पक्ष आणि अहमदनगरचे आमदार सामाजिक चळवळींसोबतच डॉ. कुमार सप्तर्षी यांनी राजकारणातही आपला सक्रिय ठसा उमटवला होता. ९ ऑगस्ट १९७७ रोजी तत्कालीन ज्येष्ठ नेते चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत ते अहमदनगर शहर मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सभागृहात अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक संवेदनशील समाजचिंतक, मार्गदर्शक आणि समाजपरिवर्तनासाठी सतत झटणारा लढवय्या नेता गमावला आहे.
Source link
ज्येष्ठ गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षी अनंतात विलीन:पुणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पडले पार, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली