![]()
गंगापूर-वैजापूर रस्त्यावरील जाखमाथा परिसरात सोमवारी सकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात व्यावसायिक दीपक हरीभाऊ डोंगरे (४०) यांचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेत दुसरी दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक डोंगरे हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्कुटीने वैजापूरच्या दिशेने जात होते. विठ्ठल आश्रमाजवळील जाखमाथा परिसरात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही चालक रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघाताचे दृश्य पाहताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, दीपक डोंगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवले जात होते; पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. तपासणीसाठी त्यांचा मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव पुढील तपास करत आहेत. मृत दीपक डोंगरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Source link
गंगापूर-वैजापूर रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात; एक ठार:अपघातात गंभीर जखमी एकावर रुग्णालयात उपचार सुरू