Headlines

मान्यता, धन्यता क्षणभंगुर व विद्वत्ता कालातीत- इंदोरीकर महाराज




मान्यता, धन्यता क्षणभंगुर आहे. विद्वत्ता कालातीत असल्याचे प्रतिपादन इंदोरीकर महाराज यांनी नागद येथे रविवारी कीर्तनात केले. आषाढीनिमित्ताने जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत व डॉ. दिलीपसिंग राजपूत मित्रमंडळाच्या वतीने कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. या वेळी त्यांनी खुमासदार शैलीत सामाजिक, मानसिक विसंगतीवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, माणसांची सगळी यातायात सुखासाठी चाललेली आहे. मान्यता, धन्यता आणि विद्वत्ता यात समाजमन गुंतले आहे. मान्यता व धन्यता क्षणभंगुर आहे. विद्वत्ता कालातीत आहे. विद्वत्ता आपण संपत्ती कशासाठी कमावत आहोत याचे भान देते. आपली मुले आपली संपत्ती सांभाळण्याच्या लायकीची आहेत का, याचा विचार करा. मुलांना धनसंपत्ती देण्याऐवजी चांगले संस्कार द्या. आई-वडील हेच दैवत आहे. गुडघे कामातून गेल्यावर दिंडी आठवण्यात अर्थ नसतो, असेही ते म्हणाले. कोणतीही गोष्ट कार्यकारणभावाशिवाय घडत नाही. क्रिया झाली तरच प्रक्रिया घडते. अज्ञान हे दु:खाचे कारण आहे. ज्ञान हेच सुख आहे. हे ज्ञात झाले की जिवंतपणी मोक्ष मिळतो, असे इंदोरीकर महाराजांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीपसिंग राजपूत यांनी केले, युवकांवर चांगले संस्कार व्हावेत. ते आभासी जगातून बाहेर पडावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, अब्दुल जावेद, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, माजी नगरसेवक सुनील पवार, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने, ऋग्वेद नागदकर, गोकुळ राठोड, साहेबराव दापके, जयसिंग जाखड, मधू राहणे, उपसरपंच नामदेव गोठवाल, अॅड. दिनेश राजपूत, माजी सरपंच रणजित पाटील, पोलिस पाटील दीपक कोळी, योगेश पाटील, सुभाष महाजन, एल. एम. सुरासे आदींसह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत यांनी मानले. कन्नड येथे आषाढीनिमित्त आयोजित कीर्तनात मार्गदर्शन करताना इंदोरीकर महाराज.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *