दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या दोन आठवड्यांपासून आपल्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींवर तसेच सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी
.
आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भूतकाळातील घटनांचा दाखला देत सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावर निशाणा साधला. “गेल्या दोन आठवड्यांपासून सोनम वांगचुक, अभिजीत दीपके आणि देशातील हजारो युवा-युवती जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक उपोषणाला बसलेले असताना त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले गेले, त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाहीये. परवा आमचे खासदार त्यांना भेटायला गेले असता त्यांनाही अडवण्यात आले. काल जेव्हा हे सगळे तरुण संसदेच्या दिशेने मोर्चा काढत होते, तेव्हा एखादा मंत्री तरी चर्चेसाठी पुढे येईल असे वाटले होते.पण तसे झाले नाही.”
भाजपच्या राजवटीच्या भयानक चेहरा पाहिला
आदित्य ठाकरे म्हणाले, “अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील ५-५ मंत्री चर्चेसाठी स्वतः पुढे गेले होते. ते विरोधी पक्षांशी आणि भाजपशीही सातत्याने संवाद साधत होते. मात्र, काल आपण भाजपच्या राजवटीचा अत्यंत भयानक आणि असंवेदनशील चेहरा पाहिला आहे,” असे ते म्हणाले.”
लहान मुलांना कानाखाली मारली
विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या बळाच्या वापरावरून आदित्य ठाकरे यांनी अत्यंत संतप्त सवाल उपस्थित केले. “शाळेतील लहान मुले आपल्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरली होती. त्या निष्पाप विद्यार्थ्यांना कानाखाली मारले गेले, महिला आंदोलकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईत सहभागी असलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सने (RAF) स्वतःच्या नावाच्या पाट्यासुद्धा काढून टाकल्या होत्या. आपल्याच देशातील भारतीय नागरिकांवर आणि मुलांवर असा अमानुष लाठीचार्ज करताना सरकारला कसलीच संवेदनशीलता उरलेली नाही का?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
आता विद्यार्थ्यांनाही माओवादी अन् दहशतवादी ठरवणार?
भाजप सरकारच्या आंदोलकांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “याआधी जेव्हा देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला होता, तेव्हा याच भाजप सरकारने त्या बळीराजाला ‘अर्बन नक्षल’, ‘माओवादी’ आणि ‘दहशतवादी’ अशी दूषणे दिली होती. त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळ्या झाडल्या. कालच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यानही केंद्र सरकारने त्याच निर्दयी आणि हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडवले आहे.”
चैत्यभूमीतील कारवाईप्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा
दिल्लीतील घटनेसोबतच मुंबईतील चैत्यभूमी परिसरात झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. “काल मुंबईतही चैत्यभूमीवर नागरिक आणि तरुण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, तिथूनही पोलिसांनी दडपशाही करत आंदोलकांना जबरदस्तीने गाड्यांमध्ये भरले आणि वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन बसवले. धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलकांमध्ये अनेक अल्पवयीन (मायनर) मुलांचाही समावेश होता. अशा प्रकारे अल्पवयीन मुलांवर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्यांविरोधात आणि अधिकाऱ्यांविरोधात आम्ही जी काही कायदेशीर कारवाई करता येईल, ती ठामपणे करणार आहोत,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
हे ही वाचा…
‘परीक्षा पे चर्चा’ प्रमाणे आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करा:इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा, हे सरकारच मानसिक रुग्ण झालंय – राज ठाकरे

दिल्लीत पेपरफुटी आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेतील अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर अन् बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. लाठीचार्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, “१८ जुलै रोजी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने फरफटत रुग्णालयात दाखल करण्यापासून ते काल विद्यार्थ्यांवर बेफाम लाठीचार्ज करण्यापर्यंतच्या घटना पाहता हे सरकारच ‘मानसिक रुग्ण’ झाले आहे आणि त्यांनाच आता रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे,” अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. सविस्तर वाचा…
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद:वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. सविस्तर वाचा…