Headlines

दिल्लीतील लाठीमार प्रकरणाची‎ चाैकशी करून कारवाई करावी‎:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎




नीट पेपरफुटीची आणि आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जखमी विद्यार्थी व पोलिस कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार व आर्थिक मदत द्यावी. विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक संवाद साधावा, असेही राकाँचे नेते म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ३ मे रोजी नीटचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत गेली. विविध संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. त्यानंतर नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या मागण्यांसाठी क्रॉकरोच जनता पक्ष आणि वांगचुक यांनी उपोषण केले. नीट पेपरफुटीवरून दिल्ली येथील आंदोलनाचे अकोल्यातही पडसाद उमटले होते. तरुणाईसह राजकीय पक्ष, शैक्षणिक, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. नीट पेपरफुटीसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करा. अशा मागण्या आंदोलनकांनी लावून धरल्या होत्या. दिल्ली येथील आंदोलनकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. दरम्यान या पोलिसी कारवाईचा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध नोंदवण्यात आला. महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार, अश्रुधुराच्या वापरासह नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता, जखमी विद्यार्थी व पोलीस कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत भारताच्या राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना नगरसेवक पंकज गावंडे, प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया, कार्याध्यक्ष देवानंद ताले, इरशाद हुसेन, फिरोज खान, मोहम्मद उमर फारूक, इनुलहाक कुरेशी, शाहिद सिद्दीकी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राकाँ पदाधिकाऱ्यांनी मागण्याही केल्या. पेपरफुटीची उच्चस्तरीय, स्वतंत्र, निःपक्ष चौकशी करावी. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसी कारवाईची स्वतंत्र चौकशी करावी. जखमी विद्यार्थी व पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार व आर्थिक मदत द्यावी. विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक संवाद साधावा. कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी. नियमानुसार पुनर्वसन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. देशातील विद्यार्थ्यांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी राष्ट्रपतींनी घटनात्मक हस्तक्षेप करून आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली. देशभरातील विद्यार्थी गेल्या २२ दिवसांपासून विविध शैक्षणिक प्रश्न, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता, भरती प्रक्रियेतील विलंब या मुद्द्यांवर शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र विद्यार्थ्यांशी वेळेत संवाद न झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे राकाँ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण अहवाल जाहीर करा निवेदनात दिल्लीतील जंतर-मंतर व संसद परिसरात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार व अश्रुधुराच्या वापराबाबत राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या कारवाईत अनेक विद्यार्थी तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेत आंदोलनांना उत्तर म्हणून बळाचा वापर न करता संवाद, चर्चा, सकारात्मक निर्णयाद्वारे प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ७८ अंतर्गत राष्ट्रपतींनी केंद्र सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तथ्यात्मक अहवाल मागवावा. त्याचा आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *