![]()
भारत हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भात आगामी २४ ते ४८ तासांत मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूरसह चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलैरोजी नागपूरसह चार जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच दिवशी अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तेथे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, दृश्यमानता कमी होणे आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सखल आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या भागात जाणे टाळावे, तसेच प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक कोंडी व प्रशासकीय सूचनांची तपासणी करून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक हवामान केंद्राने केले आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे १०५.१ मिमी आणि धानोरा येथे ९७.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भंडारा येथे ६० मिमी, ब्रह्मपूरी येथे ५०.२ मिमी, चंद्रपूर येथे ५० मिमी, नागपूर येथे ४९.२ मिमी आणि अकोला येथे ४५.९ मिमी पाऊस झाला आहे. तसेच यवतमाळ (२८.६ मिमी), बुलढाणा (२८ मिमी), वर्धा (२८ मिमी), गोंदिया (२३.२ मिमी), अमरावती (१९.८ मिमी) आणि वाशिम (१९.२ मिमी) येथेही मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
Source link
विदर्भात 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:नागपूरसह 4 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट