Headlines

‘राष्ट्रीय पोषण माह’ कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी- सीईओ गांधी:अमरावती येथे बुधवारी 9 व्या राष्ट्रीय पोषण माहचे उद्घाटन‎




बालक, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या पोषण तसेच आरोग्यविषयक गरजांबाबत जनजागृती करण्यासोबतच या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी केले. येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) सभागृहात बुधवारी ९ सप्टेंबर रोजी नवव्या राष्ट्रीय पोषण माहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सीईओ गांधी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, डायटचे प्राचार्य मिलिंद कुबडे, अधिव्याख्याता प्रवीण राठोड, आहारतज्ज्ञ वृषाली चव्हाण यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. पुढे बोलताना गांधी यांनी पोषण माह हा केवळ एक शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागातून उभी राहणारी चळवळ ठरावी, यासाठी अंगणवाडी स्तरावर दर्जेदार, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम राबविण्याचे आवाहन गांधी यांनी केले. पोषण आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध असल्याने जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोषणाचे महत्त्व रुजविण्यासोबतच लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यावर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहसाठी शासनाकडून पाच प्रमुख थीम निश्चित करण्यात आल्या असून, त्यामध्ये आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिने, अंगणवाडी केंद्रामध्ये ताजा व गरम शिजवलेला आहार, स्थानिक समुदायाची मालकी व जबाबदारी, बालकांच्या विकासासाठी पोषण व बाल्यकालीन उत्तेजन तसेच प्रधानमंत्री मातृ वंदन योजना अंतर्गत माता आरोग्यासाठी रोख हस्तांतरण लाभ या विषयांचा समावेश आहे. या पाचही विषयांवर आधारित विविध जनजागृतीपर उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध विषयांवरील माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी घरपोच आहार तसेच स्थानिक अन्नघटकांचा वापर करून तयार केलेल्या विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका आरती चिकटे यांनी केले, तर आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नवनाथ घणतोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार अधिकारी दीपक ढवळे व सारंग काळे तसेच पर्यवेक्षिका सुचिता श्रीराव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अनेकांचे सहकार्य लाभले. सीईओंनी घेतला अन्नपदार्थांचा आस्वाद स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अन्नघटकांचा पौष्टिक आहारामध्ये प्रभावी वापर कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिक याठिकाणी देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गांधी यांनी या स्टॉलला भेट देऊन पाककृतींची पाहणी केली तसेच आहाराची चव घेऊन उपस्थित अंगणवाडी सेविकांशी आहाराची गुणवत्ता, पौष्टिकता, स्थानिक अन्नघटकांच्या वापराबाबत संवाद साधला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *