Headlines

"प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच…":तुकाराम मुंढे यांचे उत्तर ऐकून अभिनेत्री काजल अग्रवाल भारावली! श्रेयस तळपदेसह घेतली मुंढेंची भेट




सामाजिक विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळणारा ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) हा बहुचर्चित कोर्टरूम ड्रामा येत्या 24 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अन्नपदार्थांमध्ये होणारी जीवघेणी भेसळ आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, या चित्रपटातून वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आले आहेत. याच संवेदनशील विषयाच्या पार्श्वभूमीवर, नुकतीच श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष भेट घेतली. सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सोशल मीडियावरही याची मोठी चर्चा रंगली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेत अनेक हॉटेल्स, दुकाने आणि दूध डेअरींवर धाडी टाकल्या आहेत. यात त्यांनी कित्येक टन भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा सील केला आहे. या आक्रमक कारवायांमधून अन्नातील भेसळीचे एक भयानक आणि धडकी भरवणारे वास्तव उजेडात आले असून, आपल्या ताटात नेमके काय वाढले जात आहे, या विचाराने सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. ‘द इंडिया स्टोरी’ या आगामी चित्रपटाचा मुख्य गाभाही याच भेसळीच्या वास्तवावर आधारित असल्याने, सध्याच्या परिस्थितीशी तो अचूक मेळ खातो. याच अनुषंगाने चित्रपटातील मुख्य कलाकारांनी तुकाराम मुंढे यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर अभिनेत्री काजल अग्रवाल हिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आणि भेसळखोरांवर वचक बसवणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या धडाडीच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. काजल अग्रवाल काय म्हणाली? काजल अग्रवालने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, तुकाराम मुंढे सरांना भेटणे हा एक अतिशय सुखद अनुभव होता. सर, करत असलेल्या कामाचा मला नेहमीच आदर वाटतो. या भेटीदरम्यान, त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा याचे मी आवर्जून कौतुक केले. पण, या चर्चेदरम्यान त्यांनी दिलेले एक उत्तर माझ्या कायम लक्षात राहणार आहे. सर म्हणाले, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या गोष्टी माझ्या कामाचा एक भाग आहेत… आणि मुळात हे माझ्या DNA मध्येच आहे. तुम्ही या गोष्टींकडे काहीतरी ‘असाधारण’ म्हणून पाहत असाल तर, यावरूनच प्रामाणिकपणा, निष्ठा किती दुर्मिळ झालीये हे कळून येते. हीच अलिकडची दुर्दैवी परिस्थिती आहे…, त्यांचे हे उत्तर ऐकून माझ्याही मनात अनेक विचार आले… कठीण प्रसंग आले तरी दृढनिश्चयाने योग्य ती गोष्ट करायची पुढे काजल अग्रवाल म्हणाली, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी दृढनिश्चयाने योग्य ती गोष्ट करायची… अशा प्रेरणादायी व्यक्तीला मी भेटले. सरांसारखे लीडर्स आपल्याला जाणीव करून देतात की, सचोटीने वागणे हा विशेष गुण नसून, ही प्रत्येकाच्या आयुष्यातली फार सामान्य गोष्ट असायली हवी. प्रत्येकाने असेच खरेपणाने वागले पाहिजे. काजल अग्रवाल म्हणाली, योगायोग म्हणजे, आमच्या ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) सिनेमातून सुद्धा हाच संदेश देण्यात आलाय. अन्नभेसळ, कीटकनाशकांचा अतिवापर आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या घटनांकडे फक्त मूकपणे पाहणे, हे आपल्याला ग्राहक म्हणून परवडणारे नाहीये, अशा भावना तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *