![]()
हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना या संकटकाळातून बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून, त्याप्रमाणे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय येथे ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त’ आयोजित देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, आमदार शंकर मांडेकर, महापौर मंजुषा नागपुरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, कृषी सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, कृषी आयुक्त सूरज पांढरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून भरणे म्हणाले की, अजित पवार यांना कृषी क्षेत्राविषयी जिव्हाळा होता. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. त्यांनी देशी गाईचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणाकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. या केंद्राच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी, शेती उत्पादनात वाढ करावी आणि शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा, ही कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण (एआय) आणण्यामागची राज्यशासनाची भूमिका आहे, असे भरणे यांनी स्पष्ट केले. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे २० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची मदत करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांची ४० हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचे पूर्वीचे वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि अवजारे मंजूर करण्यात आली असून, येत्या काळात शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृहे बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ च्या माध्यमातून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत भूमिहीन महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असून, त्यांना विविध कृषी विषयक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनाही राबविण्यात येत आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.
Source link
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते देशी गोवंश प्रदर्शन उद्घाटन:शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील: कृषी मंत्री