![]()
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून, सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर नाशिक, पालघरसह कोकणातील जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुराच्या पाण्यामुळे १५ ते १६ गावांचा मुख्य संपर्क तुटला आहे. दुसरीकडे, मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे तानसासह तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहे. पालघरला पावसाचा सर्वाधिक फटका गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे डहाणू ते विरार दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सारणी-उर्से-ऐना या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने, परिसरातील जवळपास १५ ते १६ गावांचा मुख्य बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ६४ ते ६५ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईचे तलाव भरले, पाणीटंचाईचे संकट टळले मुंबई आणि उपनगरांमध्ये (ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर) रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या संततधारेमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे वेगाने भरत आहेत. विहार आणि तुळसी तलावांनंतर आता ‘तानसा’ जलाशयही पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे मुंबईतील सातपैकी तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, एकूण पाणीसाठा ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी, मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. वसई-विरारवरला जोरदार पावसाने झोडपले हवामान विभागाचा इशारा आणि ‘अलर्ट’ भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा-विदर्भात दिलासा, शनिवारनंतर उघडीप? अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील, मात्र २५ जुलै (शनिवार) नंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप मिळण्याची दाट शक्यता आहे. संबंधित बातमी वाचा.. छत्रपती संभाजीनगर शहरात 33 तासांत 46 मिमी पावसाची नोंद:अकोला, यवतमाळला आज यलो अलर्ट शहरात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत ३२.३, तर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.७ असा एकूण ३३ तासांमध्ये शहरात ४६ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात २३३.२ मिमी अपेक्षितच्या तुलनेत २२८.९ मिमी (९८.२ टक्के) पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही पाऊस झाला. मात्र, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाचा धुमाकूळ:पालघरमध्ये शाळांना सुट्टी, पुण्यात 'रेड अलर्ट'; मराठवाडा-विदर्भात दिलासा, शनिवारनंतर उघडीप?