![]()
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाया राज्यभर सुरूच असून, आता त्यांच्या कारवाईचा फटका थेट बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयालाही बसला आहे. FDAच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकत तपासणी केली आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीन सील करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचारी आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली भोजन व्यवस्था तात्पुरती बंद झाली आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील या कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे 7 ते 8 हजारांहून अधिक कर्मचारी आणि नागरिक जेवण करतात. त्यामुळे FDAच्या या कारवाईची मुंबईत मोठी चर्चा सुरू झाली आहे. कॅन्टीन बंद झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आज घरून डबा आणण्याची वेळ आली. मोठ्या आस्थापनांवरही कारवाईचा धडाका तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. लहान हॉटेलांपासून ते मोठ्या आणि प्रसिद्ध खाद्य आस्थापनांपर्यंत कोणालाही सूट दिली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवर स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 110 वर्षांच्या पारशी डेअरी फार्मवरही कारवाई FDAने नुकतीच मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील 110 वर्षांहून अधिक जुनी पारशी डेअरी फार्म या प्रतिष्ठित संस्थेवरही कारवाई केली. 1916 मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक डेअरीमध्ये तपासणीदरम्यान स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर संस्थेचा परवाना निलंबित करण्यात आला. आता AIच्या मदतीने तक्रार नोंदवणे अधिक सोपे दरम्यान, भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी AI-आधारित नागरिक तक्रार प्रणाली सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून तक्रार नोंदवू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) नागरिकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे तक्रार आपोआप तयार करते, संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते आणि कारवाईच्या प्रत्येक टप्प्याचा मागोवाही घेता येतो. तुकाराम मुंढे काय म्हणाले? या उपक्रमाबाबत माहिती देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “सुशासन म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी बनवणे होय. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाची उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे.” ते पुढे म्हणाले, “भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला… तुमची तक्रार स्पष्ट आणि पूर्ण मुद्द्यांसह आपोआप तयार होईल.” FDAच्या सलग कारवायांमुळे राज्यातील अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर संदेश दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
Source link
तुकाराम मुंढेंचा मुंबई महापालिकेलाही दणका!:दररोज 7 ते 8 हजार जण जेवण करणारे BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; FDAची धडक कारवाई