![]()
तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरात बुधवारी (२२ जुलै) सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काहींची घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने या भागातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे आदिवासी भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने संसार उघड्यावर आले आहेत. बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत झालेला पाऊस आणि (कंसात या पावसाळ्यातील एकूण पाऊस) मिमीमध्ये खालीलप्रमाणे: घाटघर: १८५ मिमी (एकूण: २०३५ मिमी), रतनवाडी: १७४ मिमी (एकूण: १५९ मिमी), पांजरे: १६० मिमी (एकूण: १२७२ मिमी), भंडारदरा: १२९ मिमी (एकूण: १०३७ मिमी), वाकी: १२२ मिमी (एकूण: ८५६ मिमी), निळवंडे: २२ मिमी (एकूण: ५५३ मिमी). वादळाचा फटका भंडारदरा गावातील रहिवासी माऊली खाडे यांना बसला. वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे त्यांच्या घराचे पत्रे दूर उडून गेले आणि भिंतींची पडझड झाली. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तातडीने प्रशासनाला सूचना देऊन रस्त्यावरील झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. तसेच, नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर देण्यासाठी आमदारांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. “शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल,” असा धीर त्यांनी बाधित कुटुंबांना दिला. आपत्तीची गांभीर्यता लक्षात घेऊन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून तात्काळ तलाठी आणि ग्रामसेवकांना घटनास्थळी पाठवून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वादळामुळे डोक्यावरचे हक्काचे छप्पर गमावलेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून तात्पुरता निवारा आणि आपत्कालीन मदत उपलब्ध करून देण्यात आली.
Source link
घाटघरमध्ये 185 मिमी पावसाची नोंद:भंडारदरा परिसरात घरांची पडझड, पत्रे उडाले; झाडे पडल्याने वाहतूक ठप्प