‘नीट’ परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीला कंटाळून आत्महत्या केलेल्या नागपूरची विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी हिच्या आई नीलम चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आमची लेक गेली, पण सरकारमधील एकाही मंत्र्याने किंवा नेत्याने साधा फोन क
.
नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोज जनता पार्टीचे मागील सुमारे महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. सध्या जंतर-मंतर वर देशभरातील विद्यार्थी जमा झाले आहेत. संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत आज नागपूर शहरातील संविधान चौकात देखील आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आकांक्षा चतुर्वेदी हिची आई सहभागी झाली होती.
नेमके काय म्हणाल्या नीलम चतुर्वेदी?
“आमच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या या संपूर्ण कारभाराची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. ज्या नराधमांनी पेपर लीक केला आहे, त्यांना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एखादी दुर्घटना घडली तर विचारपूस करणे हे सरकारचे काम असते, पण इथे कुणी एक फोनसुद्धा केला नाही. मग आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही का?” असा संतप्त सवाल नीलम चतुर्वेदी यांनी विचारला. तसेच “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी दररोज या आंदोलनात बसणार आणि वेळ पडल्यास दिल्लीत जाऊन आंदोलन करणार,” असेही सांगितले.
एबीसीडी न येणाऱ्यांना नोकऱ्या, शिकलेल्यांना काहीच नाही
देशातील सध्याच्या शिक्षण आणि रोजगार व्यवस्थेवर नीलम चतुर्वेदी यांनी अत्यंत कडवट शब्दांत ताशेरे ओढले. “कुणाला नेता बनवायचे हे जनता ठरवते. पण त्या बदल्यात जनतेला काय मिळाले? आमच्या निष्पाप लेकीचा जीव गेला! आज देशात ज्यांना साधी ‘एबीसीडी’ येत नाही, त्यांना नोकऱ्या दिल्या जातात आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या शिकलेल्या मुलांना बेरोजगारीच्या खाईत ढकलले जाते. असले सरकार आम्हाला नको आहे. पुन्हा असे पेपर लीक झाले नाही पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीनुसार सन्मानाने रोजगार मिळाला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
दिल्लीतील लाठीचार्जवरून संतप्त सवाल अन् भावनिक साद
दिल्लीत हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जचा तीव्र निषेध करताना नीलम चतुर्वेदी अतिशय भावुक झाल्या. “कोणीही आनंदाने किंवा उगाच रस्त्यावर उतरत नाही, लोक आपला हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत मुलांवर लाठीमार झाला हे अत्यंत चुकीचे आहे. जर हीच लाठी सरकारला मारली, तर त्यांना वेदना होणार नाहीत का? सरकारला जर हे आंदोलन शांतपणे संपवायचे असेल, तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी. आणि जर तुम्ही काहीच करू शकत नसाल, तर आमची गेलेली पोरं आम्हाला परत आणून द्या!” असा हृदयद्रावक सवाल करत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
हे ही वाचा…
आई म्हणाली- NEET पुन्हा घ्याल, पण मुलगी परत आणू शकाल?:राहुल म्हणाले- आकांक्षाचा मृत्यू मोदींच्या व्यवस्थेचे पाप, भाजपने म्हटले- प्रचाराचा नेता

NEET पेपर लीक झाल्यानंतर नागपूरमध्ये आत्महत्या केलेल्या मऊगंजच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या घरी शोककळा पसरली आहे. आपल्या मुलीला गमावलेल्या आई नीलम चतुर्वेदींचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवते. त्या रडत म्हणतात, “पेपर तर तुम्ही पुन्हा घ्याल, पण माझ्या मुलीला परत आणू शकाल का?” त्यांच्या डोळ्यासमोर आजही आकांक्षाचे शेवटचे शब्द फिरत राहतात. सविस्तर वाचा…