![]()
धुळे शहराजवळील एका गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मोहाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुणी सुमारे सहा महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला देवपूर परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती 24 आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याचदरम्यान तिने गर्भपात करण्याच्या उद्देशाने काही औषधांचे सेवन केले असल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली. या औषधांचे प्रमाण जास्त झाल्याने तिची प्रकृती अधिकच खालावली. रक्तदाब झपाट्याने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. परिस्थिती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी तातडीने तिला हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच ढासळत गेली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही तिला वाचवता आले नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. गर्भ पाडण्यासाठी औषधी कोणी दिली घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, इतक्या मोठ्या कालावधीचा गर्भ पाडण्यासाठी तिला औषधे कोणी दिली, ती कोठून मिळाली, तसेच यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेवर आणि बेकायदेशीरपणे औषधे उपलब्ध होण्याच्या प्रश्नावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Source link
गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन ठरले जीवघेणे:अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू; औषधी कोणी दिली?