Headlines

एसटीच्या '44 प्रवासी मिळवा' उपक्रमाला चांगला प्रतिसाद:आषाढी एकादशीसाठी 46 हून अधिक गावांतून विशेष बस पंढरपूरला दाखल




राज्य परिवहन महामंडळाच्या ‘४४ प्रवासी मिळवा, गावातूनच थेट बस पंढरपूरला’ या विशेष उपक्रमाला यंदा अमरावती जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४६ हून अधिक विशेष बसेस पंढरपूरकडे रवाना झाल्या असून, त्या शनिवारी तेथे दाखल झाल्या. यामुळे या गावांतून आलेल्या शेकडो वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य झाले. एसटी महामंडळाने हा उपक्रम गेल्या आठवड्यापासून सुरू केला होता. ग्रामीण भागातील भाविकांना गावातूनच थेट पंढरपूर गाठता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एसटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक विशेष बसेस पूर्ण क्षमतेने भरून पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. एसटी महामंडळाकडील नोंदीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ४६ पेक्षा अधिक गावांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यामध्ये शिंगणापूर, वीरगव्हाण, तळणी, वरूड, मोर्शी, परतवाडा, अमरावती, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, बडनेरा, दर्यापूर, धामणगाव, अचलपूर, पिंपळखुटा, वाठोडा, लिहिदा, अंतोरा, चिखल सावंगी, हिवरखेड, लोणी, तळणी, बेसखेड, तळवेल, घुईखेड, तिवसा, वडगाव, नांदगाव, बेलोरा, रोशनखेडा, देवडी, रेवसा, शेंदुरजनाघाट, करजगाव, देवगाव, कसबेगव्हाण, बाबडी, लोथवाडा, हयापूर, दारापूर, डोंगरगाव आणि येवता या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांतून भक्तगणांना घेऊन एसटी बसेस थेट पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत. शिंगणापूर येथील नारायण नवरंगे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “मी गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरला जात आहे. यावर्षीही आम्ही गावातून ४४ प्रवासी एकत्र केले. १८ जुलै रोजी अर्ज केला आणि २२ जुलैला आमच्या गावातून दोन बसेस पंढरपूरसाठी रवाना झाल्या. प्रवास अतिशय आरामदायी झाला आणि कोणतीही गैरसोय झाली नाही. महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सध्या आम्ही पंढरपूर येथे असून गुरुवारी परतणार आहोत.” या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अमरावतीचे वाहतूक नियंत्रक प्रल्हाद ठाकरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी ‘लालपरी’ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या उपक्रमाला अधिक प्रतिसाद मिळाला असून, वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भविष्यात अशाच काही योजना वेळोवेळी राबविल्या जातील आणि त्यांनाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *