![]()
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त धाकटी अलंकापुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र भगवानगडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि संत भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर हरिनाम, भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या वारकऱ्यांसाठी भगवानगड हे श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या भाविकांनी विजयी पांडुरंग आणि संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेत आषाढी एकादशी साजरी केली. यावेळी भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने शंभर क्विंटल साबुदाणा फराळाचे अन्नदान करण्यात आले. वारकरी परंपरेतील ही सेवा अनेक वर्षांपासून सुरू असून कार्तिकी एकादशीला घोगस पारगाव ग्रामस्थांकडून फराळाचे अन्नदान केले जाते. संत भगवानबाबांनी उभारलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, त्याचे उंच शिखर, सुवर्ण कळस, दगडी कोरीवकाम, गर्भगृहातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती तसेच मंदिरासमोरील दगडी कासव भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. भगवानबाबा समाधी मंदिर, धौम्य ऋषी मंदिर, महारुद्र हनुमान मंदिर आणि जनार्दन स्वामी मंदिरामुळे भगवानगड वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. यात्रेनिमित्त भगवानगड परिसरात विविध दुकाने थाटण्यात आली होती. घोगस पारगाव, माळेगाव, एकनाथवाडी आणि भालगाव येथील युवकांनी वाहनतळाची व्यवस्था सांभाळली, तर स्वयंसेवकांनी दर्शनरांगांचे नियोजन केले. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलfस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष पूजेनंतर दर्शनाला प्रारंभ झाला आणि दिवसभर भक्तांनी विठ्ठल-रुक्मिणी व संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावाने साजरा केला.
Source link
भगवानगडावर भाविकांसाठी शंभर क्विंटल साबुदाणा फराळ:धाकट्या अलंकापुरीत आषाढीला भक्तीचा महासागर, भाविकांची गर्दी