Headlines

ताडोबा जंगलात विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करताना आली वाघीण:5 वीज कर्मचारी एकाच खांबावर 1 तास अडकले, वाघिणीची गुरगुर पाहून 9 पैकी 4 जण चढले ट्रॅक्टरवर




चंद्रपुरातील ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील मूल तालुक्यात फुलझरी गावातील महावितरणचे कर्मचारी विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करत असताना अचानक वाघीण झुडपातून शांत, दबक्या पावलांनी त्यांच्या समोर आली तोच क्षणाचाही विलंब न करता पाच कर्मचारी चपळाईने विजेच्या खांबावर चढले. इतर ४ जण ट्रॅक्टरवर जाऊन बसले. खाली येरझारा मारणारी वाघीण पाहून विजेच्या खांबावर राहावे लागले. गुरुवारच्या या घटनेचा व्हिडिओ यापैकी ट्रॅक्टरवर बसलेल्या एका कर्मचाऱ्याने तयार केला तो रविवारी व्हायरल झाला.या घटनेचा हा थरार…त्यांच्याच शब्दांत. फुलझरी गावापासून दीड किमीवर वीज दुरुस्तीचे काम सुरू होते. या वेळी जंगलाच्या बाजूने भयंकर डरकाळी ऐकू आली. आम्ही क्षणभर थबकलो. पण त्याकडे फारसे लक्ष न देता काम चालूच ठेवले. नंतर दुपारी १.३० वाजता पुन्हा एकदा तीच डरकाळी अगदी जवळून ऐकू आली. दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी झाडीतून भल्यामोठ्या आकाराची वाघीण समोर उभी ठाकली. तिला पाहताच माझ्यासह पाचही जण क्षणार्धात खांबावर चढले. बाकी चार जण कसेबसे ट्रॅक्टरमध्ये चढले. आमचे लाईनमन लोणारे काकांना धावताही येत नव्हते व खांबावर चढताही येत नव्हते. अशा स्थितीत सहकाऱ्यांनी सुरक्षितपणे जवळच्या ट्रॅक्टरमध्ये चढवले. त्यांच्यासोबत विशाल टेकाम व कार्तिक पाखमोडेही ट्रॅक्टरमध्ये शिरले. खरे तर विजेच्या खांबावर एका माणसाला नीट उभे राहायला जागा नसते. तिथे भीती आणि जीव वाचवण्याच्या धडपडीत मी, मंगेश लेंझे, गणेश शेंडे, चेतन बावने आणि अक्षय सुकारे असे पाच जण एकाच पोलवर सरसर वर चढलो. दोघे जण अवघड अशा झुल्यावर लटकत होते आणि उरलेले तिघे वरच्या टोकाला ताणून बसले होते. कोणाचाही तोल सुटू नये म्हणून एकमेकांना धीर देत आम्ही तिथेच घट्‍ट पकड धरून राहिलो. वाघीण हलकेच पावले टाकत थेट आमच्याकडेच येत होती. ती चालत यायची…, थांबायची, खाली बसायची, मान वर करून आमच्याकडे उग्र नजरेने पाहायची…अन् पुन्हा एक पाऊल पुढे टाकायची. ती अगदी ट्रॅक्टरमधील सहकाऱ्यांवर झेप घेण्याच्या तयारीत होती. शेवटी खांबासमोरच्या झाडीत जाऊन बसली व तिथून खांबाकडे रागाने पाहत राहिली. वाघिणीचे ते लाल चुटुक डोळे अन् ती भयंकर गुरगुर पाहून आम्ही जीव मुठीत धरून एकाच जागेवर खिळून होतो. या प्रसंगातही ट्रॅक्टरमध्ये लपलेल्या विशाल टेकामने मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला. नंतर धीर धरून आम्ही फोन लावून वरिष्ठांना माहिती दिली. वनविभागाची टिम आल्याने आम्ही सर्वांनी आमचे विजेचे काम पूर्ण केले. पण सायं. ५.३० च्या सुमारास ट्रॅक्टरवरील लोखंडी पोल खाली पडला होता. तो उचलत असताना वाघीण पुन्हा झाडीतून बाहेर आली. यावेळी ती आधीपेक्षा जास्त रागात होती. क्षणाचाही विलंब न करता सहकाऱ्यांना दुचाकीवर बसवून तातडीने सुरक्षित ठिकाणी पळवून लावले. माघारी फिरतानाही ती वाघीण उग्र नजरेने आमच्याकडे पाहत होती. खांबावर लटकलेल्या एका सहकाऱ्याची इतकी भयंकर अवस्था झाली होती की “आपण आता वाचणार नाही’ या भीतीने तो पुढे रात्रभर झोपूच शकला नाही. आता हा प्रसंग आठवला की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अक्षरश: जीव मुठीत धरून खांबावर बसलो गुरुवारी दुपारी २.१२ वाजेच्या सुमारास दबक्या पावलाने वाघीण येताच कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. पाच कर्मचारी सरसर वीज खांबावर चढले. तब्बल एका तासाने वाघीण निघून गेल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *