![]()
अडगाव बु. अकोट उपविभागांतर्गत येणाऱ्या अडगाव बु. येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) विविध कामांचा आढावा घेण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीदरम्यान आयोजित चर्चासत्रात बोलताना मुंबई येथील प्रकल्प अधिकारी डॉ. स्वाती संत यांनी अडगाव बु. गावातील महिला बचत गटांनी विविध व्यवसायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी ६० टक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामसचिवालयात आयोजित कार्यक्रमात प्रशासक शोभा खंडारे यांनी डॉ. स्वाती संत यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. या प्रसंगी माजी सरपंच अशोक घाटे, गटनेते संजय राजनकर, प्रशासक गायत्री चिम, सहाय्यक कृषी अधिकारी विठ्ठल बिहाडे, प्रकाश पेठे, मनुष्यबळ संनियंत्रण अधिकारी शुभांगी लहुडकर, तंत्रज्ञान समन्वयक नीलेश लिप्ते, एनआरएम समन्वयक गजानन पाकदाने, अभिनंदन पारसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्षेत्रभेटीदरम्यान महिला बचत गट, ‘उमेद’ व ‘माविम’ अंतर्गत बचत गट, ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गट व स्थानिक शेतकऱ्यांसोबत सभेच्या माध्यमातून सविस्तर चर्चासत्र पार पडले. यात गावात राबवण्यात येत असलेल्या हवामान अनुकूल तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यात बेड पद्धतीने लागवड, शून्य मशागत पद्धत, बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क तयार करणे, सापळा पीक लागवड, चिकट व कामगंध सापळे लावणे. तसेच पक्षी थांबे उभारणे, या बाबींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषीताई ज्योती विजय खिरोडकर व समूह सहाय्यक दत्तगीर गिरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रज्ञान समन्वयक श्रीहरी सोनटक्के यांनी केले, तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी विठ्ठल बिहाडे यांनी मानले. ग्रामसचिवालयात आयोजित मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिक पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद क्षेत्रभेट कार्यक्रमांतर्गत डॉ. स्वाती संत यांनी प्रगतीशील शेतकरी मनोहरलाल फाफट, सुधीर देशमुख यांच्या शेतावर भेट दिली. तेथे जैविक निविष्ठा उत्पादन, वेस्ट डिकम्पोजर, ट्रायकोडर्मा, एनपीके, जिवामृत व दशपर्णी अर्क प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Source link
महिलांनी बचत गटांमार्फत व्यवसायाला प्राधान्य द्यावे:60 टक्के मिळणार अनुदान, प्रकल्प अधिकारी डॉ. स्वाती संत यांचे मेळाव्यात प्रतिपादन